सोलापूर मनपाकडून 168 कोटींची वसुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्चएण्ड जवळ आल्याने सोलापूर महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीने विविध पथकांच्या माध्यमातून कर वसुली, तसेच जप्ती मोहीम सुरू आहे. चालू वर्षी मिळकत करापोटी 310 कोटींचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आजपर्यंत 168 कोटी 28 लाख रुपये करवसुली झाली आहे. मागील वर्षी 132 कोटी आजपर्यंत वसूल करण्यात आले होते. त्या तुलनेत सुमारे 36 कोटी अधिक वसुली करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे.

सोलापूर महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीने विविध पथकांच्या माध्यमातून करवसुली तसेच जप्ती व सीलची कारवाई सुरू आहे. सदर वसुली पथकाने तब्बल 84 लाखांची वसुली केली आहे. दरम्यान, काही मिळकतदारांकडून अभय योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे. मात्र, त्याला महापालिका प्रशासनाकडून सध्या तरी नकार देण्यात आला आहे.

महापालिकेची आत्तापर्यंतची संपूर्ण थकबाकी 697 कोटी रुपयांची आहे. त्यापैकी चालूवर्षी 168 कोटी वसूल झाले आहेत. मागील थकीतपैकी 12 टक्के वसुली करण्यात आली आहे. चालू करवसुली 65.5 टक्के झाली आहे.

मिळकत कर विभागअंतर्गत वसुली मोहीम सुरूच असून, एका दिवसात 83 लाख 16 हजार 393 रुपये कर भरणा झाला आहे, तर थकबाकीपोटी पश्चिम मंगळवार पेठेतील एक गाळा सील करण्यात आला आहे. सोलापूर शहरातील पश्चिम मंगळवार पेठ, जोडभावी पेठ, 51 पेठ आदी विविध पेठनिहाय दिवसभरात मिळकत कर थकबाकीदारांकडील वसुलीची मोहीम राबविण्यात आली. 8 मिळकतदारांच्या 26 लाख रुपये थकबाकी रकमेपैकी 24 लाख 87 हजार 399 रुपये वसूल करण्यात आले आहे, तर पश्चिम मंगळवार पेठेतील शांताबाई टिपण्णा यांच्याकडील 4 लाख 58 हजार 525 रुपये थकबाकीपोटी एक गाळा सील केला आहे.

सोलापूर महापालिकेच्या वतीने मिळकत करासंदर्भात अभय योजना देण्यात येणार नाही. यामुळे नागरिकांनी कोणतीही वाट न पाहता कटू कारवाई टाळण्यासाठी थेट आपला कर भरावा. दरम्यान, महापालिकेची जप्ती व सीलची कारवाई सुरूच राहणार आहे.
– शीतल तेली-उगले, आयुक्त, सोलापूर मनपा.