नागपूरमध्ये आमदार निवासजवळ 17 लाखांची लूट

656

नागपूरच्या आमदार निवासजवळ सोमवारी भरदुपारी मोटारसायकलवर आलेल्या सहा आरोपींनी एका युवकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील 17 लाख रुपयांची रक्कम हिसकावून पळ काढला.या घटनेने खळबळ माजली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विविध ठिकाणाहून रोकड गोळा करून ती बँकेत, एटीएममध्ये जमा करण्याचे कंत्राट घेतलेल्या एका खाजगी कंपनीच्या कर्मचार्‍यांनी नेहमीप्रमाणे विविध ठिकाणाहून 17 लाखांची रोकड गोळा केली. ही रोकड बँकेत जमा करण्यासाठी कंपनीचे दोन कर्मचारी एका दुचाकीवर निघाले. आमदार निवासजवळच्या  चौकात येताच मागून दोन दुचाकीवर आलेल्या सहा लुटारूंपैकी एकाने लाथ मारून दुचाकीवरील कर्मचार्‍यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळची 17 लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून लुटारू पळून गेले.

या घटनेमुळे हादरलेल्या कर्मचार्‍यांनी आपल्या कंपनीच्या वरिष्ठांना लुटमारीच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्ष आणि सीताबर्डी पोलिसांना माहिती कळविण्यात आली. दिवसाढवळ्या घडलेल्या या लुटमारीच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या