
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार नाना शंकरशेट यांनी 1848 मध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम स्थापन केलेल्या मुलींच्या पाहिल्या शाळेचा कायापालट झाला आहे. नानांच्याच गिरगाव येथील वाडय़ात उभारलेली हि शाळा तब्बल 175 वर्षानंतर पुन्हा दिमाखात उभी राहिली आहे. एकीकडे मुंबई महाराष्ट्रातील मराठी शाळा एकापाठोपाठ बंद पडत असताना नानांच्याच वाडय़ात पुन्हा उभ्या राहिलेल्या या मराठी शाळेच्या नव्या वास्तूचे लोकार्पण एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मराठा साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर हिंदुस्थानांत इंग्रजांचे राज्य सुरु झाले. त्या काळात पुढच्या पिढीला शिक्षण देऊन समर्थपणे उभे करायचे असेल तर शिक्षणाला तरणोपाय नाही हे जाणून नाना शंकरशेट यांनी 1822 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन संस्थेची स्थापना केली.आधुनिक भारतातील हि पहिली शिक्षण संस्था. या संस्थेच्या माध्यमातून नानांनी एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना केली. पण मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते,स्त्राr शिकली तर ती समाज सुशिक्षित करेल हे जाणून नाना शंकरशेट यांनी स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेची स्थापना केली, आणि या संस्थेच्या माध्यमातूनच 1848 साली स्वत:च्या वाडय़ातच महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरु केली. या शाळेचा जीर्णेद्धार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे विश्वस्त सुरेंद्रभाऊ शंकरशेट, किरण उमरुटकर, सुभाष पेठे, आर्थिक मदत करणाऱया वॉर्ली कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट निलेश बोरकर, सिनिअर डायरेक्टर (कन्स्ट्रक्शन)) ए. एल. बेनी, धनंजय डुंबरे, जुही सिन्हा, संस्थेच्या अध्यक्ष वृंदा भागवत, उपाध्यक्ष संपदा जोशी, कार्यवाह देवेंद्र खेडेकर, नयना वैवुडे, खजिनदार अॅड. सच्चीदानंद हाटकर, यांच्यासह असंख्य मान्यवर आणि गिरगावकर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते वास्तूचे लोकार्पण, ‘वॉर्ली’ ने दिला मदतीचा हात
ही शाळा 175 वर्षांनंतरही पवित्र ज्ञानदानाचे कार्य करत आहे. पावणे दोनशे वर्षे झालेली शाळेची वास्तू संपूर्णपणे जीर्ण झाली होती, परंतु हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचा निर्धार शाळेच्या संचालक मंडळाने केला. संस्थेचे विश्वस्त सुरेंद्रभाऊ शंकरशेट आणि किरण उमरुटकर यांनी निधी संकलन करतानाच वॉर्ली या संस्थेशी संपर्क साधला आणि या संस्थेने या कार्यासाठी मोठी देणगी दिली, त्यामुळे नवी इमारत बांधणीचा प्रश्न चुटकीसरसा सुटला. विजयकुमार बांदोडकर यांनी या शाळेची नेटकी एक मजली वास्तू उभारली. या वास्तूचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.


























































