रेकॉर्ड ब्रेक! एकाच दिवसात 19 हजारांवर महिलांचे लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राखी पौर्णिमेचे औचित्य साधून आज फक्त महिलांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी सहापर्यंत रेकॉर्ड ब्रेक 19 हजार 510 महिलांचे लसीकरण पूर्ण झाले होते. रात्री उशिरापर्यंत 20 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने राखी पौर्णिमेचे औचित्य साधून सोमवारी फक्त महिलांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालये, 14 ग्रामीण रुग्णालये, 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांत फक्त महिलांसाठी पहिला आणि दुसरा डोस मिळून प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लसीकरणात 100 डोस, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे 200 डोसचे नियोजन आरोग्य विभागाने केले होते. सोमवारी सायंकाळी सहापर्यंत या केंद्रांवर 19 हजार 510 महिलांचे लसीकरण झाले. यात 15 हजार 291 महिलांना पहिला, तर चार हजार 219 महिलांना दुसरा डोस देण्यात आला. रात्री आठपर्यंत वेळ वाढविण्यात आल्याने लसीकरण सुरूच होते. त्यामुळे ही संख्या 20 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात आठ लाख 73 हजार 523 जणांचा पहिला डोस, तर तीन लाख 32 हजार 704 जणांचा दुसरा डोस असा एकूण 12 लाखांचा टप्पा ओलांडला असून, यात सहा लाख 67 हजार 338 पुरुष, तर पाच लाख 38 हजार 707 महिलांचा समावेश आहे. या मोहिमेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.