
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. त्याला कुठलीही सीमा किंवा बंधन रोखू शकत नाहीत. पण, कधी कधी हेच प्रेम अडचणीचं ठरू शकतं आणि हातात बेड्या पडू शकतात. असाच काहीसा प्रकार तामिळनाडू येथील एका तरुणीसोबत घडला आहे.
अल्पवयीन मुलाशी लग्न केल्यामुळे कोईम्बतूर येथील एका तरुणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्यावर पोक्सोअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. तिच्यावर मुलाच्या आईने लैंगिक शोषणाची तक्रारही दाखल केली आहे.
ही तरुणी दहावी नापास आहे. दहावी नापास झाल्यानंतर पुढील शिक्षण न घेता तिने कोईम्बतूर इथल्या पोलाची येथे पेट्रोल पंपावर नोकरी करायला सुरुवात केली. त्याच पेट्रोल पंपावर बारावी झालेला एक मुलगा काम करायचा. त्याच्याशी तिची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं.
मग त्या दोघांनी डिंडीगुल गाठलं. तिथे त्या दोघांनी लग्न केलं आणि ते कोईम्बतूर येथे परतले. इथे ते भाड्याच्या खोलीत राहत होते. पण, या मुलाच्या आईने तरुणीविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार केली.
त्यावरून पोलिसांनी तरुणीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिला अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.





























































