उरणमध्ये दोन अपघातात दोघे ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा

उरण तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच बुधवार ता.29 रोजी दोन वेगवेगळ्या अपघातात दोन मोटारसायकल चालक तरूणांचा मृत्यू झाला. करंजा उरण रस्त्यावर झालेल्या अपघातात साईराज धर्मा कोळी (25) या तरूणाचा उपचारा दरम्यान नवी मुंबई येथे मृत्यू झाला. तर जासई शंकर मंदिराजवळ झालेल्या अपघातात फैसल ताहिर माहिगीर (22) या परप्रांतिय तरूणाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे दोन्ही तरूण हे दुचाकी चालवत होते.

साईराज धर्मा कोळी या स्थानिक तरूणाचा बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अपघात झाला. तर जासई येथे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास झाला. फैसल ताहिर माहिगीर हा जासई येथे मत्स्यपालन व विक्रीचा व्यवसाय करत असे. मित्रासोबत रात्री पेट्रोल भरायला पेट्रोल पंपावर जात असताना त्याची दुचाकी दगडावरून घसरली आणि पडली त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव कंटेनर ट्रेलर त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र समीर माहिगीर हा जखमी झाला. या अपघाताची उरण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून बेजबाबदारपणे वाहन चालवल्याबद्दल मृत फैसल माहिगीर याच्याविरोधात भा.द.वि. 304 नुसार गुन्हा दाखल केला आहे.