घराचे छत अंगावर पडून चुलता-पुतणीचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या वेळी घराच्या पडवीमध्ये जेवण करीत असताना घराचे छत अंगावर पडल्याने चुलत्याचा व पुतणीचा मृत्यू झाला. याशिवाय वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

लक्ष्मण चंद्रभान सोनवणे (वय 42) व सानिका एकनाथ सोनवणे (वय 8) अशी मृत झालेल्या चुलता-पुतणीचे नावे आहेत, तर मृत लक्ष्मण सोनवणे यांची आई वैजयंतीबाई चंद्रभान सोनवणे (वय 65) या जखमी झाल्या आहेत.

सोनवणे कुटुंबीय शुक्रवारी रात्री आपल्या बंगल्याशेजारी असलेल्या पत्र्याच्या पडवीमध्ये रात्री जेवण करीत होते. याच वेळी पत्र्यावर सुरक्षिततेसाठी बांधण्यात आलेला व्हरांडा आणि बांधकाम पत्र्यावर पडल्याने पत्र्यासह ते सर्व या कुटुंबीयांच्या अंगावर पडले. अचानकपणे बांधकाम अंगावर पडल्याने त्याखाली जेवण करणारे सर्वजण दबले गेले. यात लक्ष्मण सोनवणे आणि सानिका सोनवणे यांचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना उपचारांसाठी रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विजय खाडे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.