आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर हा सगळ्याच क्षेत्रात झपाट्याने वाढत आहे. AI च्या मदतीने जगभरातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या नवीन शोध लावत आहेत. तसेच याचा वापर शिक्षण क्षेत्रात, बांधकाम क्षेत्रात होत आहे. त्यामुळे देश प्रगतीच्या वाटेवर जात असे आपण म्हणू शकतो. मात्र या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांना त्रास दिल्याच्या अनेक घटना घडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये घडली आहे.एका शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी AI च्या मदतीने त्यांच्या महिला शिक्षिकेचे अश्लील फोटो तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून 9 वीच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रथम महिला शिक्षकाचा अश्लील फोटो तयार केला. हा फोटो तयार करण्यासाठी त्यांनी ऑनलाइन एआय टूलचा वापर केला होता. यानंतर त्यांनी हा फोटो वेळवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. याबाबत पीडित शिक्षिकेला माहिती मिळाल्यानंतर तिने तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
पीडित महिला शिक्षिकेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नववीच्या दोन्ही विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला. ‘आम्हाला गुरुवारी या प्रकरणी तक्रार मिळाली. या महिला शिक्षिकेने केलेल्या तक्रारीच्या आधारे दोन अल्पवयीन आरोपींविरुद्ध आयटी कायद्याच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. अशी माहिती सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनचे एसएचओ मनीष सक्सेना यांनी दिली. महिलेच्या तक्रारीनंतर हे छायाचित्र वेबवरून हटवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.