कुत्र्याला खायला घातलेली बिस्कीटं मुलीने खाल्ली, 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुत्र्याला खायला घातलेली बिस्कीटं लहान मुलीने खाल्ल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना मेक्सिकोतील जालिस्को राज्यात घडली आहे. हायडी वलेरिया असं या मुलीचं नाव असून तिचा जीव वाचवण्याचा डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. 3फेब्रुवारीला या मुलीचा मृत्यू झाला. स्थानिक अधिकारी एपिग्मेनियो कारिलियो यांनी हायडीचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

हायडी तिच्या कुटुंबासोबत तोतोलान भागात राहात होती. तिच्या शेजारच्यांनी आरोप केला आहे की हायडीच्या घरी असलेला कुत्रा सारखा भुंकत असायचा. त्याला शांत करण्यासाठी अज्ञात व्यक्तीने त्याच्यासमोर विषारी बिस्कीटं टाकली होती. हायडी तिच्या एका मैत्रिणीसोबत बागेत खेळत होती. यावेळी तिने बागेतच बांधलेल्या कुत्र्यासमोर असलेली बिस्कीटं उचलून खाल्ली होती. हायडीसारखाच त्रास तिच्यासोबत खेळत असलेल्या मैत्रिणीलाही झाल्याचं कळतं आहे. हायडीच्या मैत्रिणीवर सध्या उपचार सुरू आहेत. हायडीच्या घरातील कुत्र्याला विषारी बिस्कीटं कोणी खायला घातली होती याचा सध्या शोध सुरू आहे.