20 हजार पुलांचे इन्स्पेक्शन होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या पूल दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तब्बल 20 हजार पुलांचे नव्याने इन्स्पेक्शन केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इन्स्पेक्शनची तयारी केली असल्याचे नागपूर विभागीय अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले.

या 20 हजार पुलांपैकी काही पूल तर ब्रिटिशकालीन आहेत. या सर्व पुलांचे इन्स्पेक्शन करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या कामावर सरकार 20 कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहितीही सरदेशमुख यांनी दिली.

या सर्वच पुलांच्या मजबुतीचा अंदाज या पाहणीत जोखता येणार आहे. ही पाहणी करणारी संस्था सहा महिन्यांत अहवाल सादर करेल. या अहवालानुसार पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल व ही संस्थाच या दुरुस्तीकामांवर पुढील तीन वर्षे देखरेख करेल, असेही सरदेशमुख यांनी नमूद केले.