
मिंधे गटातील 20 ते 25 आमदार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियंत्रणाखाली आहेत असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच 20-25 लोक आहेत हे फडणवीस किंवा अमित शाहांच्या सांगण्यावरून सूरतला गेले होते असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, सामनाच्या रोखठोकमध्ये एक विषय मांडला आहे. आणि हा विषय सगळ्यांनाच माहित आहे. महाराष्ट्रातलं हे सरकार जरी बहुमतातलं असलं तरी ते एकसंघता नाही एकवाक्यता नाही. आणि एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करायचे सुरू आहे. पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद, ज्याला आपण बार्गेनिंग पॉवर म्हणतो ती भाजपने संपूर्ण संपली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट सरपटणारा प्राणी झाला आहे असे संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे हे खासगीत सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतरही मुख्यमंत्रीपदी मीच राहणार असे वचन मिळाल्यामुळे आम्ही फुटलो. मला विधानसभा 2024 नंतरही आपणच मुख्यमंत्री राहणार हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही हे त्यांना विचारा, मी खोटं बोलत नाही. काल निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं. काही मंत्रीपदं दिली, काही महत्त्वाची खाती दिली, उपमुख्यमंत्रीपद दिलं. पण एकनाथ शिंदे यांचा चेहरा आपण पाहिला असेल तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शुन्यात आहेत किंवा गुंगीत आहेत. या धक्क्यातून ते सावरलेले नाहीतएकतर त्यांना 50-55 जागा कशा मिळाल्या हा पहिला धक्का, आणि दुसरं म्हणजे भाजपने दिलेला शब्द पाळला नाही हा दुसरा धक्का. या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहेत. आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झालेली आहे असेही संजय राऊत म्हणाले.
पण सरकारमध्ये चार दहा लोकांना मंत्रीपद असणं म्हणजे मान आणि प्रतिष्ठा असते असे नाही. मुख्यमंत्री म्हणून जो झोत त्यांच्यावर होता तो गेला. आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत आणि गेलेच तर पैसे मागायला जातात, कारण त्यांच्याकडे पैसे नाहीत. आता त्यांचं जे राजकारण चालेल ते पैसे आणि सत्तेवरच चालेल. आणि त्यांच्याच आमदारांमध्ये चलबिचल आहे. आहे की नाही हे तुम्हीच त्यांना विचारा, मी कशाला सांगायला पाहिजे. त्यातल्या एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीसांचे संपूर्ण नियंत्रण आहे. शिंदे गटातल्या 20-25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीसांचे पूर्ण नियंत्रण आहे. कारण हे 20-25 लोक आहेत हे फडणवीस किंवा अमित शाहांच्या सांगण्यावरून सूरतला गेले, एकनाथ शिंदेंसाठी नाही. आणि आजही त्यांच्यावर फडणवीसांचे नियंत्रण आहे. आणि उरलेले जे लोक आहेत ते चलबिचल आणि चंचल आहेत. त्यांना असं वाटतं की आपली कोंडी होतेय, भविष्यात आपल्याला नेतृत्व नाही जे आपल्याला संरक्षित करेल तेव्हा आपण पुन्हा मागे फिरायचं का अशी माझी माहिती आहे असे संजय राऊत यांनी सांगितले.
संजय शिरसाट हे अटल बिहारी वाजपेयीच आहेत. ते मोठे माणूस आहेत, त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. ते काही करू शकतात, ते शरद पवार आणि अजित पवारांना एकत्र आणू शकतात. पण चांगली गोष्ट आहे, यासाठी मी त्यांचा आभारी आहे असे संजय राऊत म्हणाले.
तसेच देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावर रहायला गेले नाही. काळी जादू, काळी जादू. मुख्यमंतरी अधिकृत निवासस्थानी का जात नाही हे काळी जादूवाल्यांनी द्यावे असेही संजय राऊत म्हणाले.

































































