‘पाचशे’ची चलती, ‘दोन हजारां’चे वांदे, ‘आरबीआय’च्या सर्वेक्षणातून नोटांची कमतरता समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने 2016 मध्ये 500 आणि 1000 हजाराच्या जुन्या नोटा चलनातून बाद करीत 500 आणि 2 हजारांची नवी नोट बाजारात आणली. मात्र सद्यस्थितीत 2 हजारांची नोट सापडणे प्रचंड मुश्कील बनले असून व्यवहारासाठी नागरिकांची पसंती पाचशेच्या नोटांनाच मिळत असल्याचे ‘आरबीआय’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

नोटाबंदीनंतर बाजारात 100 रुपयांच्या नोटांनी व्यवहार करण्यासाठी नागरिकांनी पसंती दिल्याचे ‘आरबीआय’ने सर्वेक्षणात म्हटले आहे. मात्र यामध्ये 500 च्या नोटांना सध्या सर्वाधिक पसंती आहे. मार्च 2022 मध्ये चलनात असलेल्या 500 रुपयांच्या नोटांची संख्या वाढली असून सध्या बाजारात 455468 लाख नोटा आहेत. मागील वर्षी बाजारात 386790 लाख नोटा होत्या. गेल्या वर्षी 500 रुपयांच्या 128003 नोटा बाजारात पुरवल्याचेही ‘आरबीआय’ने स्पष्ट केले आहे. नाण्यांमध्ये 5 रुपयांच्या नाण्यांचा सर्वाधिक वापर होत आहे. दोन हजारांच्या नोटांचे मूल्य मार्च 2022 मध्ये 12.60 टक्क्यांनी घसरून 428394 कोटी रुपयांवर आले आहे. जे गेल्या वर्षी 490195 कोटी रुपये इतके होते. विशेष म्हणजे, 97 टक्के लोकांना खऱया-खोटय़ा नोटांची पारखच नसल्याचेही ‘आरबीआय’च्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

दोन वर्षांत 21.81 टक्क्यांची घट

n रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्च 2022 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात व्यवहारातील 2 हजार रुपयांच्या नोटांमध्ये 12.60 टक्के घट झाली आहे. बाजारात सद्यस्थितीत 2 हजार रुपयांच्या 21 हजार 420 लाख नोटा आहेत.
n गेल्या वर्षी 24 हजार 510 लाख नोटा होत्या. तर 2020 मध्ये अर्थव्यवस्थेत 27 हजार 398 लाख नोटा होत्या. म्हणजेच दोन वर्षांत 2 हजारांच्या नोटांच्या संख्येत 21.81 टक्क्यांची घट झाली आहे.