
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्रथमच अमेरिकेला आयसीसी टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे संयुक्त यजमानपद बहाल केले आहे. 2024 ला होणाऱया या टी 20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे देश भूषवणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच अमेरिकन क्रिकेट संघ खेळाच्या एखाद्या फॉरमॅटच्या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत प्रथमच जगातील 20 क्रिकेट संघ सहभागी होतील. त्यातील 12 देशांचे संघ थेट स्पर्धेत प्रवेश मिळवतील, तर उर्वरित 8 संघ पात्रतापूर्व स्पर्धेतील क्वालिफायिंग संघांतून निवडले जाणार आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यजमान संघ असल्याने त्यांना थेट प्रवेश मिळणार आहे.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार 2024 च्या अमेरिकेतील टी 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पहिले 8 संघ यंदाच्या ऑस्ट्रेलियातील टी 20 विश्वचषकात निश्चित होतील. स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळणाऱया 12 संघांत यजमान देशांच्या 2 संघांचा समावेश असेल. उर्वरित 2 संघ 14 नोव्हेंबरपर्यंत टॉप दोन रँकिंग मिळवणारे संघ असतील. वेस्ट इंडिज पहिल्या आठ संघांत असेल तर 2 ऐवजी उर्वरित जागांसाठी 3 संघ निवडले जातील. उर्वरित 8 संघ हे आफ्रिका, आशिया आणि युरोपचे 2-2 क्वालिफायर संघ असतील. तर उर्वरित 2 संघ अमेरिका आणि पूर्व आशिया पॅसिफिक देशांतून निवडले जाणार आहेत.
प्रथमच महिलांचा अंडर 19 विश्वचषक होणार
z आयसीसीच्या बैठकीत प्रथमच महिलांची अंडर 19 आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही स्पर्धा 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जाईल. ती टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. 2023च्या महिलांच्या टी 20 विश्वचषकाचे यजमानपदही दक्षिण आफ्रिका भूषवणार आहे. महिलांच्या 2024 च्या टी 20 विश्वचषकातील 8 संघ थेट पात्र ठरतील. त्यातील 6 संघ 2023 च्या महिला टी 20त दोन गटांत पहिली तीन स्थाने मिळवणारे असतील आणि उर्वरित 2 पैकी 1 यजमान संघ तर दुसरा टॉपचे आयसीसी रँकिंग मिळवणारा क्वालिफायर संघ असेल. महिलांच्या या टी 20 विश्वचषकात जगातले 10 संघ खेळणार आहेत.






























































