21 हजार शासकीय वाहने भंगारात; जुन्या मोटारींच्या जागी आता नवीन मोटारी धावणार

21000-government-vehicles-scrapped-new-fuel-efficient-vehicles-to-replace

राज्य शासनाच्या सेवेत असलेली पंधरा वर्षांपेक्षा अधिक वयाची तब्बल 21 हजार वाहने आतापर्यंत भंगारात काढण्यात आली आहेत. त्यामुळे आता या वाहनांच्या जागी इंधनात बचत करणारी आणि प्रदूषण कमी करणारी वाहने शासकीय सेवेत दाखल करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करण्याबरोबरच वाहनांच्या सुरक्षितेत वाढ, इंधनाची कार्यक्षमता सुधारणे, वाहनांच्या देखभालीचा खर्च कमी करणे, जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणण्यासाठी राज्यातील शासकीय, निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक परिवहन उपक्रमातील 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी वाहने भंगारात (निष्काषित) काढण्याचे नियम जारी झाले आहेत. ही वाहने भंगारात काढल्यावरच नवीन वाहने खरेदी किंवा भाडेतत्त्वावर घेता येतील असा सरकारी नियम आहे. याअंतर्गत पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुनी सुमारे तेरा हजार वाहने शासकीय सेवेत होती. ही सर्व वाहने या वर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत भंगारात काढण्यात येणार होती. अशा प्रकारे आतापर्यंत 21 हजारांहून अधिक वाहाने भंगारात काढली आहेत.

1800 ट्रक भंगारात

आतापर्यंत सुमारे एक हजार 812 ट्रक भंगारात काढले आहेत. त्यात पेंद्र सरकारचे 388, राज्य सरकारचे 1 हजार 325 आणि पोलीस खात्याचे 99 ट्रक भंगारात गेले आहेत. तर 2 हजार 107 बसेस भंगारात काढल्या. त्यात राज्य सरकारच्या अखत्यारीतील 1 हजार 941 ट्रकचा समावेश आहे. त्याशिवाय पोलीस खात्याच्या 3 हजार 97 वाहानांचा समावेश आहे. या नियमाअंतर्गत दुचाकी, मोटारी आगीचे बंब, रुग्णवाहिका, जीप यांचाही समावेश आहे. अशा प्रकारे आतापर्यंत 21 हजार 648 विविध वाहने भंगारात काढण्यात आली आहेत.