दहिसर एसव्हीपी महाविद्यालयाच्या 23 विद्यार्थ्यांचे निकाल लागले, युवासेनेच्या प्रयत्नाना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दहिसरच्या सरदार वल्लभभाई पटेल, ज्युनियर महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील 47 विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थ्यांचा निकाल युवासेनेच्या प्रयत्नाने लागले. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे मायग्रेशन सर्टिफिकेट उशिरा पाठवल्यामुळे तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाने याबाबत लक्ष न दिल्यामुळे या 47 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते.

याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी युवासेनेशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली. त्यानंतर युवासेनेने महाविद्यालयात संपर्क साधून विश्वस्त मेहुल पटेल आणि मनीष ठाकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. युवासेना सिनेट सदस्य शशिकांत झोरे आणि महादेव जगताप यांनी बोर्डाचे अधिकारी बोरसे यांच्याशी संपर्क साधला. तसेच महाराष्ट्र शिक्षण बोर्डाचे सचिव शंकर खंडागळे, अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांची भेट घेऊन सर्व विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यासाठी पाठपुरावा केला. बारावीच्या 47 विद्यार्थ्यांचे निकाल लवकरात लवकर लागावे यासाठी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम यांच्या सूचनेनुसार सिनेट सदस्य शशिकांत झोरे, महादेव जगताप, शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी या प्रकरणात लक्ष घातले. युवासेनेमुळे बारावीचा राखीव राहिलेल्या 47 पैकी 23 विद्यार्थ्यांचा निकाल लागला आणि उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल 12 जूनपर्यंत लागेल, असे बोर्डातर्फे सांगण्यात आले.