
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूने थैमान घातले. गेल्या 24 तासांत या रुग्णालयात औषधांअभावी 24 रुग्णांनी जीव गमावला. त्यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला असून मिंधे सरकारच्या आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली
दर तासाला एक मृत्यू
बेशिस्त, अनागोंदी माजलेल्या या रुग्णालयात गेल्या 24 तासांत मृत्यूने अक्षरशः थैमान घातले. दर तासाला एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. यात 12 नवजात बालकांचा समावेश असून त्यात सहा पुरुष आणि सहा स्त्र्ााr जातीची बालके आहेत. उर्वरित 12 रुग्ण हे विषबाधा आणि सर्पदंश झालेले होते, अशी माहिती आहे. पाच दिवसांच्या सलग सुटय़ा, कर्मचाऱ्यांचा दुष्काळ, डॉक्टरांच्या सुटय़ा यामुळे रुग्णालयात दाखल रुग्ण चक्क रामभरोसेच होते. त्यातच रुग्णालयात औषधींचा भयंकर तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी 24 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.
नांदेडच्या विष्णुपुरी भागात सर्व सोयींनी सज्ज असे शासकीय रुग्णालय बांधण्यात आले असून ‘हेडमास्तर’ म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध असलेले, करडय़ा शिस्तीचे भोक्ते डॉ. शंकरराव चव्हाण यांचे नाव या रुग्णालयाला देण्यात आले आहे. विदर्भ, तेलंगणा तसेच संपूर्ण मराठवाडय़ातून या रुग्णालयात लोक उपचारासाठी येतात. सुरुवातीला रुग्णालयाचे प्रशासन शिस्तीत काम करत होते. मात्र आता प्रशासनच रुग्णालयातून गायब झाले आहे. अस्वच्छता, औषधांसाठी होणारी रुग्णांची लूटमार यासाठी हे रुग्णालय ओळखले जाते.
‘हाफकीन’ने औषधपुरवठा थांबवला
शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्यामराव वाकोडे यांनी रुग्ण दगावल्याची कबुली दिली. याबाबतीत तत्काळ अहवाल मागवला असल्याचे ते म्हणाले. रुग्णालयातील अनेक डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात जोडून आलेल्या सुटय़ा, औषधांची कमतरता आहे. काही दिवसांपासून हाफकीनने औषधपुरवठा थांबवला आहे. मात्र गंभीर परिस्थितीत बाहेरून औषध आणून उपचार केले जातात. सर्पदंश आणि विषबाधेवरील औषधांचा तुटवडा असून दगावलेल्या रुग्णांमध्ये याच रुग्णांचा समावेश असल्याचेही डॉ. वाकोडे म्हणाले.
अभ्यागत समिती नावालाच, सूचना केराच्या टोपलीत
शासकीय रुग्णालयाची अभ्यागत समिती नावालाच आहे. समितीने वर्षभरात अनेक बैठका घेऊन रुग्णालय प्रशासनाला सुधारणेसाठी सूचना केल्या. परंतु अभ्यागत समितीच्या सूचना प्रशासनाने केराच्या टोपलीत टाकल्या. स्वच्छता, उपचार आणि औषधांचा तुटवडा यावर अनेकदा चर्चा झाली. पण प्रशासनाला त्याचे कोणतेही गांभीर्य नाही. मुळात रुग्णालय प्रशासनाला रुग्णांच्या जिवाचे मोलच नाही- संतोष पांडागळे, अभ्यागत समिती सदस्य
रुग्णसेवेचा बँड वाजला
शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवेचा पूर्ण बँड वाजला आहे. गंभीर रुग्णांना वाऱ्यावर सोडून देणे, त्यांच्यावर उपचार न करणे हे नित्याचेच आहे. 24 रुग्णांच्या मृत्यूने रुग्णालय प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. ही घटना अतिशय गंभीर असून तातडीने चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे- दत्ता कोकाटे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख
सरकारच जबाबदार
सरकार अजून किती निष्पाप नागरिकांचा बळी घेणार आहे? मागील 24 तासांत नांदेड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये 24 निरपराध रुग्णांचा योग्य सुविधांअभावी जीव गेला आहे. यात 12 नवजात बालकेसुद्धा आहेत. अशीच घटना काही दिवसांपूर्वी ठाणे येथे घडली होती. त्याचे दुŠख अजून संपलेले नाही तर ही मनाला वेदना देणारी दुसरी घटना घडली आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा आहे. कमतरता असूनसुद्धा औषधांची खरेदी हाफकीनने केलेली नाही. औषधांच्या तुटवडय़ामुळे निरपराध नागरिकांचा बळी जात असून नांदेडसारख्या घटनांना सर्वस्वी सरकार जबाबदार आहे- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते
कळवा रुग्णालय मृत्युकांडात 18 बळी, तरी चौकशी समितीची सर्वांना क्लीन चिट
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 12 ऑगस्ट 2023 रोजी एकाच रात्री 18 रुग्णांचा बळी जाऊन हाहाकार उडाला होता. त्या रात्री आयसीयूत डय़ुटी असलेल्या दोन डॉक्टरांनी रुग्णांना तपासले नसल्याचे व त्यांच्यावर उपचारच केले नसल्याचे समोर आले होते. याप्रकरणी सरकारने नऊ जणांची चौकशी समिती नेमली. एका आठवडय़ात अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. मात्र प्रत्यक्षात एक महिन्यानंतर अहवाल आला. धक्कादायक म्हणजे चौकशी समितीने सर्वांना क्लीन चिट दिली. मग मृत्युकांडास जबाबदार कोण, असा सवाल निर्माण झाला आहे.






























































