
कोयना धरणाअंतर्गत विभागात संततधार पावसामुळे धरण पाणीसाठय़ात अपेक्षित वाढ सुरू आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 25 हजार 90 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मागील 24 तासांत 2.39 टीएमसी पाण्याची आवक झाली असून, पाणीउंचीत पाच फूट दोन इंचांनी वाढ झाली आहे. धरणात सध्या एकूण 26.27 टीएमसी पाणीसाठा असून, त्यापैकी उपयुक्त साठा 21.27 टीएमसी इतका आहे.
कोयना धरणाअंतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर आदी सर्वच ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. कोयना विभागातील गोकुळ तर्फ हेळवाक येथे पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे व तहसीलदार रमेश पाटील यांनी महसूल, पोलीस, जलसंपदा, कृषी, बांधकाम आदी विभागांतील अधिकाऱयांची भेट घेतली.
या ठिकाणी गतवर्षी भूस्खलन होऊन आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले होते. संबंधित नाल दगड, माती यामुळे पूर्णपणे बंद झालेला होता. उन्हाळ्यामध्ये या नाल्याचे खोलीकरण व सरळीकरण केल्यामुळे पाणी जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने लगतच्या वस्त्यांमध्ये पाणी घुसण्याची शक्यताकमी झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनासमाधान व्यक्त केल्याची माहिती सुनील गाढे यांनी दिली.






























































