चेंबूर वसतिगृहात 250 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार; प्रवेश प्रक्रिया सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदवी, विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या, परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या मागासवर्गीय आणि इतर घटकांतील 250 विद्यार्थ्यांना चेंबूर येथील संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहात प्रवेश दिले जाणार आहेत. मुंबई उपनगर जिह्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱया संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाला इमारत मिळाल्याने हे प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना 20 मेपर्यंत संत एकनाथ मुलांचे वसतिगृह, भिक्षेकरी गृह परिसर, आर. सी. मार्ग, चेंबूर येथे वसतिगृहाच्या प्रवेश अर्जांचे वाटप व स्वीकृती केली जाणार आहे.

वसतिगृहाच्या इमारतीची दुरुस्ती आणि बांधकाम सुरू असल्याने 250 हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकले नव्हते. मात्र आता प्रवेशासाठी येणाऱया अर्जांवरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

वसतिगृह प्रवेशाकरिता जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत. सदर विद्यार्थ्याकडे पालकांच्या उत्पन्नाचा दाखला असावा. विद्यार्थी सन 2022-2023 मध्ये महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावा, स्थानिक रहिवासी नसावा, विद्यार्थ्याचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा, अशा अटी प्रवेशासाठी देण्यात आल्या आहेत.