गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासाकरिता चिपळूण आगारातून 254 जादा गाड्या; चाकरमान्यांसाठी सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकारमानी गावी येत असतात. मुंबई-पुणे, बोरीवली, कल्याण आणि ठाणे या शहरातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या पाहाता गणेशोत्सवानंतर चाकारमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच चिपळूण आगारातून पाच सप्टेंबरपासून 254 गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिली.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होता. त्यामुळे चाकारमानीसुद्धा बहुसंख्येने गावी आले नव्हते. मात्र आता कोरोनाचं संकट टळल्याने व सर्व क्षेत्रातील बंद्या शिथिल केल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या लाडक्या गणरायाला घरी आणण्यासाठी मुंबईतून गावाकडे येणार आहेत. गणेशोत्सव झाल्यानंतर या सर्व चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी चिपळूण आगार नेहमीच सज्ज असते. प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, यासाठी चिपळूण आगारातून प्रयत्न केले जातात.

यावर्षी 5 सप्टेंबरपासून परतीच्या प्रवासासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई, बोरीवली, ठाणे, कल्याण, पुणे व चिंचवड या शहरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आगारातून सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ग्रुप बुकींगसुद्धा आगारातून सुरु करण्यात आलेली आहेत. परतीच्या प्रवासाकरिता सोडण्यात आलेल्या जादा गाड्यांचा लाभ चाकरमान्यांनी घ्यावा, असे आवाहन चिपळूण आगार प्रमुख राजेशिर्के यांनी केले आहे.