कळंगुटमध्ये बुडून मध्यप्रदेशच्या युवकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

कळंगुट किनाऱ्यावर बुडून भोपाळ (मध्यप्रदेश) येथील 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली.

कळंगुटचे पोलीस निरिक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळ, मध्यप्रदेश येथील नवीन आचार्य हा युवक आपल्या 7 भावांसोबत मंगळवारी फिरण्यासाठी गोव्यात आला होता. बुधवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही सगळी मंडळी कळंगुट किनाऱ्यावरील समुद्रात उतरली होती. त्याच वेळी आलेल्या जोरदार लाटेच्या तडाख्याने त्यातील तिघे समुद्रात खेचले गेले. त्यानंतर तेथील काही लोकांनी तिघांना पाण्याबाहेर काढले. त्यावेळी नवीन निपचित पडला होता. त्याला तातडीने कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

कळंगुट पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये शवविच्छेदन करण्यात आले, त्यात नवीनचा मृत्यू बुडून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी नवीनचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सुपुर्द केला आहे.