जिल्ह्यातील 267 इमारती धोकादायक: रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे निर्देश

195

सामना प्रतिनिधी । अलिबाग

रायगड जिल्ह्यात जुन्या धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून नगरपालिका, नगरपंचायत परिसरातील धोकादायक इमारतीचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी मागविला होता. त्यानुसार प्रमुख शहरातील केलेल्या सर्वेक्षणात 267 धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. या सर्व इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

मुंबई पुण्यात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटना आणि रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण दुर्घटनांची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारती आणि धरणांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर अलिबाग, कर्जत, माथेरान, रोहा, मुरुड आणि पेण नगरपालिकांनी आपले अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केले. या शहरांमध्ये प्राथमिक पहाणीत 267 इमारती धोकादायक असल्याचे दिसून आले. यात कर्जत येथे सर्वाधिक 226, अलिबाग 12, रोहा 10, पेण 9, मुरुड 4, तर माथेरान 6 धोकादायक इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम 1965 च्या कलम 195 अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यानुसार इमारतींमधील रहिवाश्यांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले आहे.

पनवेल महानगरपालिका, महाड, श्रीवर्धन, उरण, खोपोली नगरपालिका आणि खालापुर, तळा, म्हसळा, माणगाव सुधागड येथील नगरपंचायती यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी निर्देशानंतरही अद्याप आपले अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केलेले नाहीत. मुंबईतील डोंगरी येथे मंगळवारी चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. 12 जणांचा मृत्यू झाला तर 40 जण ढिगाऱ्या खाली अडकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन उर्वरीत नगरपालिका आणि नगरपंचायतींनी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करणे, तसेच तेथील रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या सुचना देणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 15 जुलै पर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार 267 इमारती धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व इमारतींना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम 1965 च्या कलम 195 अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.- सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रायगड

आपली प्रतिक्रिया द्या