
राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेची कुंडलीच आज विधानसभेत सादर झाली. खून, बलात्कार, विनयभंग, सायबर गुन्हे, ड्रग्जच्या केसेसची जंत्रीच तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीतून पुढे आली. सध्या बीडमधील ‘आकागिरी’ चर्चेत आहे. याच बीडमध्ये मागील पाच वर्षांत तब्बल 276 खून पडले आहे. मागील वर्षी फक्त दहा महिन्यांत 36 खून झाल्याची धक्कादायक आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. रायगड जिल्ह्यात एका वर्षात 193 बलात्कार झाले तर विनयभंगाच्या 263 घटना घडल्या, तर सायबर फसवणुकीत सर्वसामान्यांची तब्बल 7 हजार 634 कोटी 25 लाख रुपयांहून अधिक फसवणूक झाली आहे.
विधानसभेत सुरू असलेल्या गोंधळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण प्रश्नोत्तरे झाली नाही. मात्र लेखी उत्तरातून राज्याच्या विविध जिल्ह्यांतील विविध गुह्यांची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या
मुंबई शहर, ठाणे शहर, नागपूर शहर, पुणे अशा शहरांत मागील वर्षात (2024) 8 हजार 964 सायबर गुह्यांची नोंद झाली. यामध्ये फक्त 1 हजार 9 आरोपींना अटक झाली आहे, तर एकूण 7 हजार 634 कोटी 25 लाख 46 हजार 508 रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर फसवणुकीचे सर्वाधिक प्रकार मुंबई शहरात झाले आहे. 2024 मध्ये मुंबईत 4 हजार 849 गुन्हे दाखल झाले आहेत. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी सरकारने सायबर फसवणुकीच्या विरोधात विमा संरक्षण देण्याबाबत प्रक्रिया सुरू झालेली नसल्याचे लेखी उत्तरात मान्य केले आहे. सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात मोहन मते आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.
बलात्कार आणि विनयभंग
रायगड जिल्ह्यातील उरणमधील तरुणीवर अत्याचार करून हत्या झाली होती. यासंदर्भात काँग्रेसचे अस्लम शेख, अमीन पटेल आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात रायगडमधील गुह्याची माहिती दिली. त्यानुसार रायगड जिल्हाअंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बलात्काराचे 86 गुन्हे तर विनयभंगाचे 106 गुन्हे नोंदवण्यात आले, तर रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात बलात्काराचे 107 तर विनयभंगाचे 157 गुन्हे नोंदवण्यात आले.
बीडमधील कायदा व सुव्यवस्था
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरानुसार बीड जिल्ह्यात मागील पाच वर्षांत एकूण 276 खून, 766 खुनाचा प्रयत्न करण्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या दहा महिन्यांच्या कालावधीत 36 गुह्यांच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.
राज्याला अमली पदार्थांचा विळखा
राज्यात मोठय़ा प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री होत असल्याबद्दल भाजपचे अमित साटम यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील लेखी उत्तरातील माहितीनुसार 2024 मध्ये 4 हजार 240 कोटी 90 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
































































