जालन्यातील घरफोडीचा उलगडा; तीन आरोपींना अटक, 5 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त

जालना शहरातील बडीसडक रोडवरील माजी नगराध्यक्षा लाहोटी व सुनिल लाहोटी यांच्या घरी चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन कपाटातील 9 लाख 82 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल 7 डिसेंबरच्या मध्यरात्री चोरुन नेला होता. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, बडी सडक रोडवरील सुनिल लाहोटी यांची घरफोडी ही विजयकुमार सतेंद्रप्रकाश गुप्ता (रा. गोपाळपुरा, जालना) याने व त्याच्या साथीदारांनी केली आहे. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विजयकुमार गुप्ता याला जालना शहरातून ताब्यात घेत चौकशी केली. तो सुनिल लाहोटी यांच्या मंडप डेकोरेशनच्या व्यवसायात इलेक्ट्रीशन म्हणून पुर्वी काम करत होता. त्याला घराची सर्व माहिती होती. विजयकुमारने इतर साथीदार आनंदसिंग मोहनसिंग ठाकूर( रा. जेईएस कॉलेजच्या जवळ जालना), सोनु लखनसिंग जाटव (रा. महाराजा दरवाजाच्या जवळ इटा ता.जि. इटा, राज्य उत्तरप्रदेश) यांच्यासह लाहोटी यांचे घरी चोरी केल्याचे सांगितले.

आरोपींकडे चोरीस गेलेल्या मालाबाबत चौकशी केली असता नगद 41 हजार 920 रुपये, सोन्या-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅक्टीवा स्कुटी असा एकुण 5 लाख 57 हजार 72 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तीनही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी सदर बाजार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहेत. विजयकुमार याची चौकशी केली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन आरोपीच्या घराची पाहणी केली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल, दोन मॅगझीन व वेगवेगळे आकाराची 21 जिवंत काडतुसे असा एकूण
27 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विजयकुमार गुप्ताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.