टोकियो ऑलिम्पिक 2020 – 3×3 बास्केटबॉल प्रकाराचा पहिल्यांदाच समावेश

265

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांमध्ये सपाटून मार खाणाऱ्या हिंदुस्थानात याच बास्केटबॉल खेळाचा प्रचार व प्रसार होऊ लागला आहे. अमेरिकेतील सुप्रसिद्ध ‘एनबीए’मधील दोन संघ मुंबईत भिडल्यानंतर आता पुढील वर्षी मार्च महिन्यात 3×3 बास्केटबॉल या खेळाची टोकियो ऑलिम्पिक पात्रता फेरी हिंदुस्थानात आयोजित करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन (फिबा) यांच्या वतीने आणि बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) यांच्या अधिपत्याखाली ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. लढतीचे ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.

यजमानांनाही चान्स

यजमान संघ हिंदुस्थान या पात्रता फेरीत सहभागी होणार आहे. त्यापुढे टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक करण्यासाठी संधी या संघाकडेही असणार आहे, अशी माहिती बीएफआयचे अध्यक्ष गोविंदराज केम्पारेड्डी यांनी यावेळी दिली. बंगळुरूमध्ये दोन आशिया कपचे आयोजन करण्यात आले होते. तसेच 3×3 जागतिक टूअरचा थरारही हैदराबादमध्ये रंगला होता. या सर्व कारणांमुळे हिंदुस्थानकडे आयोजनपद सोपवले आहे, असे स्पष्ट मत फिबाचे आंद्रेस झॅगक्लिस यांनी व्यक्त केले.

सहा संघांना पात्रतेची संधी

3×3 बास्केटबॉल या खेळाचा प्रकार पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. पुरुष व महिलांचे आठ संघ यामध्ये पदकांसाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. हिंदुस्थानात होणाऱ्या पात्रता फेरीत पुरुषांचे 20 व महिलांचे 20 संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. यामधील दोन्ही गटांतून सर्वोत्तम तीन संघांना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या