
सराफ व्यावसायिक बंडू ऊर्फ राजेंद्र चिंतामणी हल्लाप्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत तपास लावत या प्रकरणातील तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. चोरीच्या उद्देशाने या आरोपींनी चिंतामणी यांच्यावर हल्ला केला होता.
विशाल शिवाजी एडके (रा. पाथर्डी), दीपक दत्तात्रय राख (रा. केडगाव), दीपक तोताराम सोमणकर (रा. राघुहिवरे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राजेंद्र चिंतामणी हे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास आपले दुकान बंद करून घरी गेले होते. यावेळी आरोपी विशाल एडके, दीपक राख, दीपक सोमणकर या तिघांनी चिंतामणी यांच्यावर सत्तूरने वार केले होते. चिंतामणी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पाथर्डी बंद ठेवत पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी सात दिवसांत आरोपींना अटक केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज तपास अधिकारी सचिन निमकर यांच्या पथकाने नगर व राघुहिवरे येथे जात या तीनही आरोपींना ताब्यात घेतले. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
कॉन्स्टेबल भगवान सानप, नीलेश म्हस्के, देवीदास तांदळे, अतुल शेळके, राहुल निमसे, संदीप कानडे, संदीप गर्जे, ईश्वर बेरड, लक्ष्मण पवार, ज्ञानेश्वर रसाळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.



























































