लेख – चरित्रकाराचे चरित्र

897

>> दुर्गेश आखाडे

अनेक थोर व्यक्तींची चरित्रं लिहिणारे धनंजय कीर चरित्रकार म्हणूनच ओळखले जातात. त्यांच्या या लिखाणामुळेच अनेक युगपुरुषांचे कार्य सामान्य लोकांना जाणता आले. अशा या धनंजय कीर यांचा 12 मे हा स्मृतिदिन. त्यांचे इंग्रजी भाषेतील ‘लाईफ स्केच ऑफ द ग्रेट बायोग्राफी’ हे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेले इंग्रजी जीवनचरित्र लवकरच वाचकांच्या समोर येत आहे. त्यानिमित्त…

ज्यांनी इतिहास घडवला अशा महापुरुषांची चरित्रे लिहिणारे चरित्रकार धनंजय कीर यांचं जीवनचरित्र आता इंग्रजी भाषेतून जगाच्या भेटीला येत आहे. स्वातंत्र्यकीर विनायक दामोदर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज यांची इंग्रजी आणि मराठीतून चरित्रे लिहून त्यांच्या महान कार्याबरोबरच हे महापुरुष कसे घडले हे पुढच्या पिढ्यांना सांगण्याचे काम धनंजय कीर यांनी केले. अशा महापुरुषांची चरित्रे लिहिणर्‍या धनंजय कीर यांच्या जीवनपटाविषयी जिज्ञासा निर्माण होणे स्वाभाविक आहे. या चरित्रकाराच्या चरित्राचा शोध घेताना अनेक गोष्टी गवसतात.

धनंजय कीर यांनी इंग्रजी भाषेतून चरित्रे लिहून अनेक युगपुरूषांचे कार्य, त्यांचे जीवन जगाला जाणून घेण्याची कवाडे आपल्या लेखनातून उघडी करून दिली. अशा धनंजय कीर यांचे ‘लाईफ स्केच ऑ़फ द ग्रेट बायोग्राफर’ हे इंग्रजी भाषेतील चरित्र आपल्या भेटीला येत आहे. पद्मभूषण धनंजय कीर यांचा स्मृतिदिनी 12 मे रोजी असतो. या नव्या इंग्रजी जीवनचरित्राचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतिदिनी म्हणजे 26 मे रोजी होत आहे.

राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी धनंजय कीर यांचे मराठी चरित्र लिहिले. आता इंग्रजी भाषेतील चरित्रही त्यांनीच लिहिले आहे. रत्नागिरीचे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी यापूर्वी धनंजय कीर यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या चरित्राचा इंग्रजी अनुवाद केला. अनेक थोर व्यक्तींची चरित्रे लिहिणार्‍या धनंजय कीर यांची फारशी माहिती कुठे उपलब्ध नव्हती. ही जबाबदारी राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी खांद्यावर घेतली. या कामात धनंजय यांचे सुपुत्र डॉ. सुनीत कीर यांचे सहकार्य लाभले. धनंजय कीर  यांनी महापुरुषांची आत्मचरित्रे प्रामुख्याने इंग्रजी भाषेत लिहिली. त्यामुळेच हे आत्मचरित्र इंग्रजी भाषेत असावे असे मसुरकर आणि डॉ. सुनीत कीर यांना वाटत होते. हे आत्मचरित्र लिहीत असताना मसुरकरांनी कीर यांची शैली जपण्याचा प्रयत्न केला आहे.

धनंजय कीर यांनी चरित्र लिहिताना आपल्या इंग्रजी भाषेतील चरित्राचा मराठीत किंवा मराठीतील चरित्राचा इंग्रजीत अनुवाद केला नाही, तर दोन्ही भाषेत स्वतंत्र लिखाण केले आहे. तोच धागा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी कीर यांच्या इंग्रजी चरित्रासाठी ठेवला आहे.

धनंजय कीर यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांची चरित्रे लिहिली. सावरकर आणि कीर यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि धनंजयरावांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. ते सर्व चरित्रात आपोआपच  आले. धनंजय कीर यांचे आणखी एक वैशिष्टय़  म्हणजे अनेक महान व्यक्तींच्या हस्तमुद्रिकांचे त्यांनी केलेले संकलन होय. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे, पंडीत शामाप्रसाद मुखर्जी, बालगंधर्व, महर्षी कर्वे, सरोजिनी नायडू, सेनापती बापट, न. चि. केळकर या सर्व महान व्यक्तींच्या हस्तमुद्रिका रत्नागिरीतील पतितपावन मंदिराच्या परिसरातील सावरकर स्मारकात आपल्याला पाहायला मिळतात. धनंजयरावांना हस्तमुद्रिकांचे ज्ञान होते हे याकरून जाणवते.

धनंजय कीर यांच्या चरित्रलेखनाची भाषा सोपी आहे. प्रत्येक चरित्रलेखनात चरित्रनायकाची वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनशैलीतून प्रकट होतात. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या चरित्रात भाषाशैली उत्कट, अलंकारिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रात संघर्ष सांगणारी भाषाशैली आहे. महात्मा फुलेंच्या चरित्रात साधी सोपी वाटणारी भाषा प्रसंगी कठोरपणा दाखवते. शाहू महाराजांच्या चरित्रातील भाषा तितकीच आकर्षक आणि टोकदार आहे. प्रत्येक चरित्रात धनंजय कीर यांच्या चरित्रलेखनाचे पैलू अनुभवायला मिळतात.

आपली प्रतिक्रिया द्या