
सामना ऑनलाईन । भुवनेश्वर
ओडिशा विधानसभेत महिलांना विधानसभा आणि लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत यावर चर्चा झाली आणि अखेर अवाजी मतदानाने ते पारित करण्यात आले.
सत्ताधारी पक्ष बिजू जनता दल तर विरोधी पक्ष काँग्रेस आणि भाजपने या या प्रस्तावाला समर्थन दिले. महिलांना मिळालेले आरक्षण ही ऐतिहासिक आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पटनायक यांनी दिली. तर लोकसभेत हा प्रश्न प्रलंबित असून ओडिशाने हा प्रस्ताव पास केला आहे. ओडिशामध्ये १४७ विधानसभेच्या जागा असून महिला सदस्यांची संख्या केवळ १२ इतकी आहे.
सरकारचे मुख्य प्रतोद अमर सत्पथी यांनी महिला सशक्तीकरणात ओडिशा इतर राज्यांच्या पुढे असल्याची प्रतिक्रिया दिली. तर या निर्णयाबाबत विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. तर काँग्रेसचे मुख्य प्रतोद तारा बहिनीपती यांनी लोकसभा निवडणूकीसाठी महिलांना आकर्षित करण्यासाठी घेतलेला निर्णय असल्याची टीका केली आहे.




























































