विद्याविहार, घाटकोपरमधील 350 पुनर्विकास प्रकल्प रखडले; नियम शिथील करण्याची शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्याविहार, घाटकोपर परिसरात असलेल्या नौसेनेच्या वसाहत आणि वखारीजवळ बांधकाम करण्यास मनाई असल्यामुळे 350 हून अधिक गृहनिर्माण प्रकल्पांचा पुनर्विकास रखडला आहे. संरक्षण खात्याने एनओसी संदर्भातील नियम शिथील करून 2500 हून अधिक कुटुंबांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन खासदार विनायक राऊत यांना मंगळवारी देण्यात आले.

विद्याविहारमधील किरोळ, खलईगाव आणि घाटकोपरमध्ये चिरागनगर, नारायणनगर या परिसरात नौदल वसाहती आणि वखार आहे. संरक्षण खात्याच्या अंतर्गत हा सर्व परिसर येतो. नौदलाची या परिसरात 500 मीटरपर्यंत कोणतेही बांधकाम करायला मनाई आहे. मात्र, याच ठिकाणी 10 मीटरच्या अंतरावर अनेक 10-15 मजली इमारती आहेत तर भूदलाच्या परिसरात 10 मीटरच्या पुढे बांधकाम करण्याची परवानगी आहे. त्यामुळे संरक्षण दलाने नागरी परिसरात असलेल्या नौदल, भूदल आणि वायूसेना वसाहती आणि आजूबाजूच्या परिसरासाठी निश्चित अंतराचे धोरण ठरवून गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी एनओसीच्या अंतराबाबत नियम निश्चित करावा तसेच विद्याविहार, घाटकोपरमध्ये असलेला 500 मीटरच्या अंतराचा नियम शिथील करून हजारो रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी आणि सचिन भांगे यांनी लोकसभेचे गटनेते, शिवसेना खासदार विनायक राऊत यांना निवेदन देऊन केली आहे. दरम्यान, या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले.