मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री शहरात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले. या ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी 383 फरार आरोपींना गजाआड केले, तर 7 हजार 347 वाहनांची तपासणी करून दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या 75 जणांना अटक केली. सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मुंबई पोलिसांनी शनिवारी ‘ऑपेरेशन ऑल आऊट’ राबवले.
या कारवाईदरम्यान 5 प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त, 13 उपायुक्त आणि 93 पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक यांनी आपल्या हद्दीत विशेष मोहीम हाती घेतली होती. ‘ऑपरेशन ऑल आऊट’दरम्यान पोलिसांनी 252 ठिकाणी कोम्बिंग ऑपेरेशन राबवले. त्यात रेकॉर्डवरचे 1 हजार 36 आरोपी तपासले. त्यातील विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या 383 आरोपींना अटक केली, तर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 35 जणांवर कारवाई करण्यात आली. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी 7 हजार 347 वाहनांची तपासणी करून 75 दारुडय़ा चालकांना गजाआड केले. प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान पोलिसांनी 515 हॉटेल आणि मुसाफिरखाने तपासले.

























































