
अॅमेझॉनचे जंगल हे जगातील सर्वात मोठे जंगल. एकदम खतरनाक आणि रहस्यमय. इथून कुणी जिवंत येण्याची शक्यता कमीच. या जंगलात बेपत्ता झालेली चार मुले 40 दिवसांनी जिवंत सापडली आहेत. कुठल्याही चमत्कारापेक्षा हे कमी नाही. ही मुलं फळं, बिया, वेली खाऊन जगली. आजीने दिलेली शिकवण त्यांना कामी आली आणि त्यांचा जीव वाचला.
1 मे रोजी अॅमेझॉनच्या जंगलात विमान कोसळले होते. या अपघातात पायलटसह 3 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये या मुलांच्या आईचाही मृत्यू झाला होता. विमानाचे अवशेष 16 दिवसांनंतर सापडले. अपघाताच्या घटनेपासून चार मुले तेथून बेपत्ता झाली. त्यांना शोधण्यासाठी कोलंबिया सरकार आणि लष्कराने ऑपरेशन ‘होप’ सुरू केले. 100 हून अधिक जवान आणि लष्करी विमाने तसेच स्निफर डॉग शोध मोहिमेत सहभागी झाले होते. अखेर 9 जून रोजी मुले सापडली. बचावकार्यानंतर सर्व मुलांना बोगोटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चार मुलांमध्ये 13 वर्षांची लेस्ली होती. तिच्यासोबत 9, 4 आणि एक वर्षाची भावंडं होती. चार मुले 40 दिवस जंगलात राहिली. बचाव मोहिमेदरम्यान लष्कराला जंगलात कात्री, दुधाची बाटली, केसांचा बॅण्ड आणि तात्पुरता निवारा सापडला. त्यांना आजीच्या आवाजातील रेकॉर्डेड मेसेजही सांगण्यात आला, जेणेकरून मुलं एका ठिकाणी थांबू शकतील.
9 जून रोजी कोलंबियाच्या सैनिकांना मुले सापडली. त्यानंतर मुलांची आजी-आजोबांसोबत भेट घडवण्यात आली. यावेळी 13 वर्षांच्या लेस्लीने जंगलात काय घडले ते सांगितले. गलात केसांना बांधलेल्या रिबीनच्या मदतीने मुलांनी पॅम्प बनवला होता. मुले 40 दिवस फळे, बिया, मुळे आणि वेली खाऊन जिवंत राहिली. जेव्हा मुलांची आई कामावर जायची तेव्हा लेस्लीच तिच्या लहान भावांची काळजी घेत असे. आताही तिने जंगलात भावंडांची काळजी घेतली, अशी माहिती आजीने दिली.






























































