आरे तलावात 4 फुटांपर्यंत मूर्तींचे विसर्जन,पालिकेकडून 2 कृत्रिम तर 6 फिरते तलाव उपलब्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरे कॉलनीतील कृत्रिम तलावात फक्त चार फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार आहे. विसर्जनासाठी पालिकेमार्फत आरे तलाव येथे 2 कृत्रिम तलावांची तर परिसरात 6 फिरत्या तलावांची उभारणी करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, सार्वजनिक मंडळांच्या मोठय़ा मूर्ती विसर्जनासाठी मार्वे, जुहू चौपाटय़ांवर न्याव्या लागणार आहेत.

पालिका उपायुक्त (परिमंडळ-4) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनानुसार, ‘पी-दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश अव्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने आरे तलाव येथे सर्व प्रकारच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी बंदी घातली आहे. तरीही भाविकांच्या सुविधेसाठी महापालिकेच्या ‘पी-दक्षिण’ विभागाने आरे तलाव येथे 2 कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गालगत आरे रोड नाक्यावर 4 फिरते तलाव, पिकनिक स्पॉटजवळ 2 फिरते तलाव यांची उभारणी केली आहे. श्री गणेश मंडळांना या ठिकाणी 4 फुटापर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन करता येणार आहे.

विलेपार्ले जुहू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने दहावीमध्ये 91.20 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या प्राची पवार हिला 5 हजार रुपयांचा धनादेश शिवसेना नेते अनंत गीते यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष व दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम, युवासेना विस्तारक सुधीर ढाणे, रायगड जिल्हा सहसंपर्क संघटिका स्वाती दबडे, माणगाव तालुका संपर्कप्रमुख संजय साखळे, मारुती पवार, भरत देवघरे आदी उपस्थित होते.