मातोश्रीच्या आवारात शिरला चार फुटांचा कोब्रा, सर्पमित्रांनी सुखरूप सुटका करत जंगलात सोडले

शिवसैनिकांनी सदैव गजबजलेल्या ‘मातोश्री’ निवासस्थानी दुपारी एका चार फुटी विषारी कोब्राने एण्ट्री केली. ‘मातोश्री’च्या आवारातील एका पाण्याच्या टाकीमागे हे नागोबा दिसले आणि सुरक्षारक्षकांची एकच धावपळ झाली. सर्पमित्र अतुल कांबळे आणि ठाणे वन विभागाचे राऊंड ऑफिसर रोशन शिंदे यांनी तातडीने पोहोचत सुरक्षेचे सर्व नियम पाळत या नागाला शिताफीने जेरबंद केले आणि त्याची जंगलात सुखरूप रवानगी केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही सर्पमित्रांचे आभार मानले.

‘मातोश्री’जवळील पाण्याच्या टाकीमागे रविवारी दुपारी एक चार फुटी कोब्रा नाग वेटोळे घालून बसलेला दिसताच सुरक्षारक्षकांनी वाईल्ड लाइफ ऑनिमल प्रोटेक्शन ऍण्ड रेस्क्यू असोसिएशन या संस्थेला फोन करत सर्पमित्रांना पाचारण केले. सर्पमित्र अतुल कांबळे तातडीने तेथे पोहोचले. अतुल कांबळे यांनी टाकीभोवतीची गर्दी दूर करून भेदरलेल्या नागोबाला शांत करत पिशवीबंद केले. तेव्हा साऱयांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. हे रेस्क्यू ऑपरेशन तब्बल 20 मिनिटे सुरू होते. हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना स्वतः उद्धव ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. ठाणे वन विभागाचे राऊंड ऑफिसर (बोरिवली-वांद्रे) रोशन शिंदे यांना निरोप मिळताच तेही तातडीने आले. त्यानंतर या दोघांनी या नागोबाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. ‘मातोश्री’वर हा नागोबा आल्याचा आणि त्याचे रेस्क्यू ऑपरेशन केल्याचा व्हिडीओ आज सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर त्याची मीडियातही चर्चा झाली.

 तेजसला विशकरायला नागोबा आले

मातोश्रीनिवासस्थानाजवळ विषारी नाग आढळल्याबद्दल यावेळी माध्यमांनी आदित्य ठाकरे यांना विचारले, त्यावर त्यांनी मिश्कील शब्दांत उत्तर दिले. ‘आपले बंधू तेजस ठाकरे हे पशूप्रेमी आहेत. आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना विशकरण्यासाठी नागोबा आले होते. ते भाजपच्या किंवा गद्दारांच्या कार्यालयात गेले असते तर विषरिफील करायला गेले असे म्हणता आले असते; कारण गद्दारांमध्ये विष आहे’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

 मेट्रोच्या कामामुळे हजारो साप विस्थापित

मुंबई मेट्रोचे काम सुरू असल्याने हजारो साप विस्थापित झाले आहेत. ते लोकवस्तीत शिरत असल्याच्या दररोज किमान तीन ते चार डझन तक्रारी येत असल्याची माहिती अतुल कांबळे यांनी यावेळी दिली.

 मैत्री बंगल्यावरही सापाचे रेस्क्यू

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या भांडुप येथील ‘मैत्री’ बंगल्याच्या आवारातही सापाने घुसखोरी केली होती. ही माहिती मिळताच दोन सर्पमित्रांनी या सापाला शिताफीने पकडून त्याचीही जंगलात रवानगी केली होती.