मुलाला वाचवताना 30जण पाण्यात पडले, मदतीसाठी आलेला SDRF चा ट्रॅक्टर जवानांसकट विहिरीत कोसळला

मध्य प्रदेशातील विदीशामध्ये एक विचित्र अपघात घडला आहे. विदीशा जिल्ह्यातील गंजबसौदा भागात गुरुवारी काही मुलं विहिरीजवळ खेळत होती. यातला रवी नावाचा एक मुलगा विहिरीत पडला. यामुळे घाबरलेल्या रवीच्या भावाने मदतीसाठी हाका मारायला सुरुवात केली. त्याने रस्त्यात दिसेल त्याला हा प्रसंग सांगितला आणि मदतीसाठी याचना करायला सुरुवात केली. रवी विहिरीत पडल्याचं कळताच गावातली मंडळी विहिरीकडे धावली. त्यातल्या काहींनी पाण्यात उड्या मारल्या आणि रवीचा शोध घ्यायला सुरुवात केली. रात्र झाली तरी रवीचा काही शोध लागला नसल्याने आणखी काही जणांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली.

काहीवेळात विहिरीच्या कठड्याजवळ किमान 50 जण जमा झाले होते. यावेळी विहिरीच्या कठड्याजवळचा भाग खचला आणि विहिरीत कोसळला. कठड्यासोबत त्याला रेलून उभी असलेली लोकंही विहिरीत पडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार किमान 30 लोकं विहिरीत पडली होती. कठडा तुटल्यानंतर या भागात एकच गोंधळ उडाला होता. ही माणसं विहिरीत पडल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. घटनेचं गांभीर्य ओळखून आपत्ती निवारण दलाला आणि होमगार्डलाही घटनास्थळी बोलावण्यात आलं.

ट्रॅक्टरही विहिरीत पडला

बचाव दलाने जी साधनसामुग्री आणली होती त्यामध्ये एक ट्रॅक्टरही होता. बचाव कार्य सुरू असताना हा ट्रॅक्टरही विहिरीत पडला. यामुळे ट्रॅक्टरमधले 3 जवान विहिरीत पडले. अखेर पोकलेनने विहिरीची भिंत तोडून जवानांना बाहेर काढण्यात आलं. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना 5 लाखांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदतही त्यांनी घोषित केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या