
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला शेतकऱयांचा विरोध दिवसेंदिवस वाढतच आहे. बुलेट ट्रेनसाठी जमीन हस्तांतरणाला गुजरातमध्येच ब्रेक लागला असून सुरत, वलसाड, नवसारी जिह्यातील शेतकऱयांनी 40 नव्या याचिका गुजरात हायकोर्टात दाखल केल्या आहेत. बुलेटविरोधातील जुन्या व नवीन याचिकांवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरात आणि महाराष्ट्रात 1400 हेक्टर जमीन लागणार आहे. यापैकी 1120 हेक्टर जमीन ही खासगी मालकीची आहे. या जमिनीचे सहा हजार मालक असून यामध्ये बहुतांशी शेतकरी आहेत. त्यांनी बुलेट ट्रेनला कडाडून विरोध केला आहे. बुलेट ट्रेनला विरोध करणाऱया चार याचिका सुरतच्या अंत्रोली गावातील शेतकऱयांनी मागे घेतल्या. मात्र त्यानंतर लगेचच 40 नवीन याचिका दाखल करण्यात आल्या. या आठवडय़ाच्या अखेरीस 150 गावांतून 200 याचिका दाखल करण्याचा इशारा गुजरातमधील खेडूत समाजाने दिला आहे.
एक हजार शेतकऱयांचे प्रतिज्ञापत्र; विरोधासाठी जपान गाठणार
गुजरातमधील एक हजार शेतकऱयांनी बुलेट ट्रेनला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयाला सादर केले आहे. मात्र यासंदर्भात केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेले नाही. यासंदर्भात जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे यांना भेटण्याची तयारीही शेतकऱयांनी केली आहे. जपानमधील टोकियो, ओसाका, हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांत पत्रकार परिषद घेऊन जमीन हस्तांतरणासंदर्भातील अन्य विषयांवरही प्रकाश टाकण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आले आहे.































































