
पालिकेच्या मोफत आणि दर्जेदार उपचारांवर अवलंबून असलेल्या गोरगरीब झोपडपट्टीवासीयांना आता ‘पोर्टा केबिन’ दवाखान्याच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पालिकेची नियमित वेळेत चालणाऱया 9 ते 4 वेळेतील आरोग्य केंद्रांचे कामकाज बंद झाल्यानंतर सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे दवाखाने सुरू राहणार आहेत. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांना घराजवळच वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. यासाठी मुंबईत झोपडपट्टी भागातील 40 ठिकाणे निश्चित करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेची ‘केईएम’, नायर, शीव आणि कूपर अशी मोठी रुग्णालये आहेत.शिवाय कस्तुरबा विशेष विषाणू रुग्णालयासह 16 उपनगरीय रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने, 212 आरोग्य केंद्रे आहेत. या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळतात. पालिकेच्या सर्व रुग्णालयांत एकूण 12 हजार बेड आहेत. यामध्ये व्हेंटिलेटर्स, आयसीयू बेडचाही समावेश आहे. पालिकेच्या रुग्णालयांत महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातून गोरगरीब रुग्ण उपचारांसाठी दाखल होत असतात. त्यामुळे प्रमुख रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी होते. परिणामी काही वेळा उपचारासाठी येणाऱया रुग्णांची गैरसोय होते. या पार्श्व भूमीवर पालिकेच्या माध्यमातून झोपडपट्टय़ांमध्ये पोर्टा केबिन दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्रीपर्यंत हे दवाखाने सुरू राहणार असल्याने झोपडपट्टीवासीयांना फायदा होणार आहे.
असा उपक्रम राबवणार
सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवण्यात येईल. या ठिकाणी एक तज्ञ डॉक्टर, नर्स आणि सहाय्यक उपलब्ध असेल. शिवाय प्रमुख आजारांवरील औषधेही उपलब्ध असेल. यासाठी आवश्यक डॉक्टरांची कंत्राटी स्वरूपात भरती पालिकेच्या माध्यमातून करण्यात येईल.
डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता
– या ठिकाणी काम करणाऱया डॉक्टरने दिवसभरात किमान 40 रुग्ण हाताळणे अपेक्षित असेल. या डॉक्टरना पालिकेच्या नियमानुसार मानधन दिले जाईलच.
– शिवाय 40 व्या रुग्णानंतर जितके रुग्ण तपासले जातील त्या प्रत्येक रुग्णामागे 40 रुपयांचे अतिरिक्त मानधन दिले जाईल.
– झोपडपट्टी भागात गोरगरीबांना आरोग्य सेवा परिणामकारक मिळावी यासाठी हा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.


























































