उजनीत सापडला 42 किलोचा कटला मासा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । भिगवण

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या तीन तरुणांनी टाकलेल्या जाळ्यात तब्बल 42 किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला. नितीन काळे, सुदाम चव्हाण व अक्षय चव्हाण अशी मोठा मासा मिळवलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांनी मंगळवारी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील बाजारात मासा विक्री करण्यास आणला होता. हा मासा 130 रुपये किलो या दराने 5 हजार 460 रुपयांना बारामतीच्या शंकर मोरे या व्यापाऱ्याने खरेदी केला. उजनी धरण पाणलोट क्षेत्र मासेमारीसाठी सर्वात मोठे क्षेत्र आहे. हजारो मच्छिमार या ठिकाणी मासेमारी करुन आपली उपजीविका चालवतात. सध्या उजनी धरण शंभर टक्के भरले असून मासे मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातील माशांची सर्वात मोठी बाजारपेठ बनत आहे.

तब्बल 42 किलोचा मासा आढळल्याने उजनी धरण क्षेत्रातील आतापर्यंत मिळालेला हा सर्वात मोठा मासा आहे. यापूर्वी साधारण वीस ते तीस किलो वजनापर्यंतचे मासे येथून मिळाले आहेत. मंगळवारी मोठा मासा विक्रीसाठी आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी माशाबाबत माहिती घेतली आणि लिलावात त्याची विक्री करण्यात आली. सुमारे साडेपाच हजारात या माशाची विक्री झाली.

भिगवण मासळी बाजारातील आडतदार भगवान महाडिक यांच्या आडतीवर आलेला हा मासा पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. उजनत पुर्वी 50 किलोपासून शंभर किलो वजनाचे कटला जातींचे मासे सापडत होते. मात्र अलिकडे सर्वच जातींच्या माशांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे अलिकडच्या वीस वर्षातील सर्वांत जास्त वजनाचा हा मासा ठरला आहे.