कुर्ला टर्मिनसच्या तिजोरीतून 44 लाखांची रोकड लंपास, कुंपणानेच शेत खाल्ल्याचा संशय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनसच्या तिकीट बुकिंग कार्यालयाच्या तिजोरीतून 44 लाख 29 हजार 501 रुपयांची रोकड चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून या चोरीमध्ये रेल्वेच्या कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे टर्मिनस असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस (टिळकनगर 2, कुर्ला) येथील रेल्वेच्या अनारक्षित तिकिटांची विक्री होणार्‍या बुकिंग हॉलच्या तिजोरीतील रेल्वेची सुमारे 44 लाखांची रोकड काल रात्री चोरीला गेल्याचे उघडकीस आल्याने रेल्वेच्या सुरक्षाव्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. तिकीट बुकिंग कार्यालयाच्या आतील बाजूस असलेल्या कॅशरूममधून तिजोरीचे टाळे उघडून ही रक्कम गायब झाल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. या कॅश रूममध्ये कॅशियर व बुकिंग क्लार्क यांच्याशिवाय इतर कोणालाही प्रवेश नसल्याने नेमकी चोरी कशी झाली याचे कोडे रेल्वेला पडले आहे.

टिळकनगरच्या या बुकिंग ऑफिसचे मुख्य बुकिंग सुपरवायझर सुनील तेलतुंबडे (52) यांच्या जबाबानुसार कुर्ला रेल्वे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 22 सप्टेंबर रोजी पहिल्या शिफ्टमध्ये कॅशियर म्हणून विनोद मुथ्थुस्वामी पिल्ले यांना नेमले होते. त्यांच्या हाताखाली तिकीट बुकिंग क्लार्क म्हणून सहा कर्मचारी डय़ुटीवर होते.

कॅशियर-बुकिंग क्लार्क सगळेच संशयात!

दुसर्‍या शिफ्टमध्ये आलेल्या कॅशियर समीर ताहराबादकर यांना पहिल्या शिफ्टचे कॅशियर विनोद मुथ्युस्वामी पिल्ले यांनी चार्ज दिला. रविवारी रात्री 2.48 वाजता रात्रपाळीचे बुकिंग क्लार्क झम्मन मीना यांनी चीफ बुकिंग सुपरवायझर तेलतुंबडे यांना चोरी झाल्याचे कळविले. वास्तविक दिवसपाळीचे कॅशियर विनोद पिल्लेंनी रात्रपाळीचे कॅशियर ताहराबादकर यांना समक्ष चार्ज न देता ते बुकिंग क्लार्क पंकजकुमार सिंग यांच्याकडे परस्पर तिजोरीची चावी देऊन गेले व रात्रपाळीचे कॅशियर ताहराबादकर यांच्याकडे तिजोरीची चावी असल्याने त्यांनी चोरी झाल्याचे आपल्याला कळवायला हवी होते असा आरोप तक्रारदार तेलतुंबडे यांनी केला असून त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.