रेडलिस्टमधल्या 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन वर्षांपासून रखडली

60

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी अर्ज केलेल्या एक लाख नऊ हजार 385 शेतकऱ्यांपैकी 47 हजार 730 शेतकरी अजूनही रेडलिस्टमध्येच असल्याची खळबळजनक माहिती सोमवारी उघड झाली आहे. शेतकऱ्यांनी दिलेली माहिती व बँकांकडील उपलब्ध माहिती याचा ताळमेळ लागत नसल्यामुळे हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. मात्र, दोन वर्षांपासून या माहितीचा ताळमेळ का जुळवता आला नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सतत केलेला पाठपुरावा आणि शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर 2017 मध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. यामध्ये दीड लाखापर्यंतच्या कर्जापासून मुक्ती, दीड लाखावरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना त्यावरील रक्कम एकरक्कमी परताव्याप्रमाणे भरुन द्यावयाचा लाभ तसेच प्रोत्साहनपर अनुदान अशी तरतूद करण्यात आली होती. हिंगोली जिल्ह्यामध्ये एक लाख नऊ हजार 385 शेतकऱ्यांनी शासनाच्या कर्जमाफीच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी 76 हजार 529 शेतकऱ्यांची नोंद ग्रीनलिस्टमध्ये करण्यात येऊन 407 कोटी 67 लाख रुपयांचा निधी हिंगोली जिल्ह्याच्या कर्जमाफीसाठी मिळाला आहे. त्यापैकी 68 हजार 772 शेतकऱ्यांना 342 कोटी 17 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. मात्र, तब्बल 47 हजार 730 शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीची प्रतिक्षा दोन वर्षापासून आहे. या शेतकऱ्यांना कोणत्या कारणामुळे कर्जमाफी देण्यात आली नाही, याची माहितीही दोण्यात येत नाही. हिंगोलीत झालेल्या एका आढावा बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनीच सहकार विभागाच्या उपनिबंधकांना कर्जमाफीच्या रेडलिस्टचे काय, असा सवाल केल्यावर ही माहिती उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. कर्जमाफीच्या योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करायला लावण्यात आले होते. त्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शासनाने सुचनाही दिल्या होत्या. मात्र, दोन वर्षापासून 47 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी लटकली आहे. शासनाने या प्रकरणी लक्ष देऊन ही कर्जमाफी व त्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्याची मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या