
देशातील राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या अपघातांत गेल्या वर्षी तब्बल 47 हजार 984 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत ही माहिती दिली. यातील सर्वाधिक अपघात हे वाहनांची वाईट स्थिती, अमली पदार्थांचे सेवन, ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, सिग्नलचे नियम न पाळणे, गाडी चालविताना मोबाईल बोलणे यामुळे झाले असल्याचेही गडकरी यांनी अधोरेखित केले. वर्ष 2019 मध्ये राष्ट्रीय महामार्ग तसेच एक्सप्रेस वे वर 53 हजार 872 जणांचा मृत्यू झाला होता, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्राच्या रस्ते आणि वाहतूक विभागाने सर्व राज्यांसाठी रस्ते सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गाडी चालवित असताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन केले जात असल्याचेही त्यांनी लोकसभेत बोलताना सांगितले.
ऑक्सिजन टॅंकरसाठी प्रशिक्षित चालक नाहीत
लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्ना उत्तर देताना गडकरी पुढे म्हणाले. मार्च-एप्रिल 2021 मध्ये ऑक्सिजन टॅकर वाहतूकीसाठी प्रशिक्षित चालकांची कमतरता भासली. लिक्विड ऑक्सिजन (LOX) च्या वाहतुकीत सतत होणारी वाढ, ऑक्सिजन व्यवस्थापनाचा विस्तारित कालावधी, क्रायोजेनिक टँकर्सची यादी आणि चोवीस तास ऑपरेशन्समुळे चालकांवर येणारा ताण पाहता राज्यांनी ऑक्सिजन टॅंकरसाठी चालकांना प्रशिक्षित करावे अशा सूचना राज्यांना दिल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.



























































