सिराजवर ऑस्ट्रेलिया चाहत्यांची पुन्हा अपमानास्पद टिप्पणी, चार जणांना मैदानाबाहेर हाकलले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलिया व टीम इंडियामधील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी हिंदुस्थानचे गोलंदाज मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराहवर वर्णभेदी टीका केली होती. त्यांच्या या गोंधळानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने याबाबत पंचांकडे तक्रार केलेली. हे प्रकरण आयसीसीकडे पोहचून काही तास उलटले नाही. तोपर्यंत चौथ्या दिवशी देखील मैदानावर असाच प्रकार घडला.

चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर सिराज बॉऊंड्री लाईन जवळ असताना काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी पुन्हा सिराजला टारगेट करत त्याच्यावर अपमानास्पद टिप्पणी केली. त्यानंतर कर्णधार रहाणेने याबाबत पंचांकडे तक्रार केली. पंचांनी मैदानातील सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधून गोंधळ घालणाऱ्या पाच ऑस्ट्रेलियन चाहत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

दुसऱया आणि तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह या हिंदुस्थानी गोलंदाजांना शिवीगाळ करून वर्णद्वेषी शेरेबाजीही केली. या शेरेबाजीचा अतिरेक झाल्याने कर्णधार अजिंक्य रहाणेने मैदानावरील पंचांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. तिसऱया दिवसाचा खेळ संपल्यानंतर हिंदुस्थानी ड्रेसिंग रूमच्या बाहेर ‘टीम इंडिया’च्या अधिकाऱयांनी ‘आयसीसी’ व स्टेडियमवरील सुरक्षा अधिकाऱयांशी चर्चा केली. या चर्चेत बुमराह, सिराज यांच्यासह कर्णधार रहाणे व रविचंद्रन अश्विन उपस्थित होते. या वर्णद्वेषी शेरेबाजीबद्दल त्यांनी पंच पॉल रिफिल व पॉल विल्सन यांच्याशी चर्चा केली होती.