पाच वर्षांत फडणवीस सरकारने ओरबाडून खाल्ले – अनिल गोटे

1205

स्वातंत्र्यानंतर आजवरच्या राज्यकर्त्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सर्वाधिक भ्रष्ट सरकार होते. भाजपच्या काही नेत्यांनी समृद्धी महामार्गात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार केला असून पाच वर्षांत फडणवीस सरकारने अक्षरशः ओरबाडून खाल्ले असा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. काम करणारा राध्येश्याम मोपलवार हा सर्वाधिक भ्रष्ट अधिकारी असून त्याला तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत असल्याचेही गोटे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान होत असताना माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपवर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठय़ा प्रमाणात लबाडी करीत भ्रष्टाचार केला आहे. समृद्धी महामार्गाच्या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. राधेश्याम मोपलवार या भ्रष्ट व्यक्तीला फडणवीस यांनी पाठीशी घातले. भाजपने भ्रष्टाचारातून मोठय़ा प्रमाणात पैसा कमविला आहे.  गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा 210 फूट उंचीचा पुतळा सहज उभारण्यात आला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अनेक वर्षे उलटूनदेखील होत नाही. याचा अर्थ हे सरकार मराठीद्वेष्टे आहे. आरोप तोच व्यक्ती करतो, ज्याच्याकडे पुरावे असतात, असे म्हणत गोटे यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान दिले आहे.

निवडणुकीत पैशांचा वापर

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पैशांचा वापर करून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न भाजपचे स्थानिक नेते करीत आहेत, पण मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतील. पंचायत समितीच्या एका गणात भाजपकडून 10 ते 20 लाखांचे वाटप केले जात आहे. महसूल आणि पोलीस यंत्रणा भाजपच्या दावणीला बांधली गेली आहे. त्यामुळे गैरव्यवहार आणि गैरवर्तन करणाऱया भाजपच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर काहीही कारवाई होत नाही. गैरव्यवहाराची माहिती जिल्हा पोलीसप्रमुखांना दिली आहे. पण, तरीही प्रतिसाद नाही, असे गोटे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या