बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । आंबेगाव

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या साकोरे गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. श्रुतिका थिटे (5) असं मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून ती मामाच्या गावात आली होती. घराशेजारी शेतात खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रुतिकावर हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली होती. मात्र उपचार सुरू होण्याअगोदरच तिचा मृत्यू झाला.

खेड तालुक्यातल्या जऊळके गावातील श्रुतिका तिच्या आईसह साकोरे गावात मामा अंकुश कडूसकर यांच्याकडे पाच दिवसांपूर्वीच राहण्यास आली होती. रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घरासमोरील मक्याच्या शेतात आजी कुसुम कडूसकर व स्वाती काम करत होत्या. यावेळी श्रुतिका त्यांच्या जवळच खेळत होती. मात्र, अचानक शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून श्रुतिकाला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. श्रुतिकाच्या आई व आजीने आरडाओरड केल्यामुळे परिसरातील नागरिक धावून आले, त्यामुळे बिबट्याने श्रुतिकाला टाकून धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात श्रुतिकाच्या गळ्याला गंभीर जखम झाली होती. तिला तत्काळ मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.