
सामना प्रतिनिधी, मुरुड-जंजिरा
ऐतिहासिक पद्मदुर्गावर काही शिवप्रेमींनी लोखंडी मनोरा उभारून त्यावर भगवा फडकवल्याने पुरातत्व खात्याने थयथयाट केला आहे. याविरोधात प्रशासनाने थेट मुरुड पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली असून 50 जणांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. सरकारी बाबूंच्या या मुघल सल्तनत कारभाराविरोधी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुरुड समुद्र किनाऱ्यावरून सुमारे चार किलोमीटर सागरी अंतर पार केल्यानंतर सुप्रसिद्ध ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर पोहोचता येते. येथे मोठ्या बोटीद्वारे दररोज हजारो पर्यटक किल्ल्यावर जातात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किल्ल्यावरून पुरातन अशी लोखंडी तोफ चोरण्यात आली होती. परंतु तब्ब्ल आठ महिन्यांच्या कालावधीनंतर सदरची तोफ एकदरा पुलाच्या खाली सापडली होती. मात्र पुरातन वास्तूची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांकडे लक्ष देण्याऐवजी किल्ल्यावर भगवा फडकावणाऱ्या 50 शिवप्रेमींविरोधात पुरातत्व खात्याने मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पुरातत्व खात्याचे अधिकारी प्रकाश घुगरे म्हणाले, पद्मदुर्ग किल्ल्यावर 50 लोकांच्या समूहाने उंच मनोरा बनवण्यासाठी आपल्या सोबत लोखंडी साहित्य घेऊन आले होते. एका बुरुजावर हा मनोरा तयार करून भगवा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न होता. परंतु याची आम्हाला वेळीच खबर लागताच आम्ही या ठिकाणी पोहोचून सर्व साहित्य ताब्यात घेतल्याचे सांगितले. झेंडा लावण्यासाठी रीतसर परवानगी आणावी मगच झेंडा लावावा, असेही त्यांनी सांगितले.
सायंकाळी 5 नंतर गडाचे दरवाजे बंद
जंजिरा किल्ल्यात पूर्वी सायंकाळी 7 वाजेपर्यंत पर्यटक राजपुरी जेट्टीवरून जात होते. परंतु किल्ल्यात विजेची सोय नसल्याने पुरातत्व खात्याने सायंकाळी मुख्य प्रवेशद्वाराला लोखंडी दरवाजा केला आहे व तो 5 वाजता बंद करतात त्यामुळे 5 नंतर आलेल्या पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. या निर्णयावर पर्यटक नाराज आहेत. तरी किल्ल्यात विजेची सोय लवकरात लवकर करून पर्यटकांना 7 वाजेपर्यंत राहण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी होत आहे.






























































