कोपरगाव तुरुंगातील 50 कैदी नाशिक जेलमध्ये रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव येथील तहसील कार्यालयालगत असलेल्या दुय्यम तुरुंगातील 91 कैद्यांपैकी 50 कैद्यांना नाशिक येथील दुय्यम कारागृहात चोख पोलीस बंदोबस्तात पाठवण्यात आले आहे. क्षमतेपेक्षा जादा संख्या झाल्याने त्यांना नाशिक येथील कारागृहामध्ये पाठवण्यात आले आहे. आता कोपरगाव येथील कारागृहात 41 कैदी आहेत. क्षमतेपेक्षा जादा झालेल्या कैद्यांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी दिली.

येथील दुय्यम कारागृहात वर्षानुवर्ष क्षमतेपेक्षा जादा कैदी ठेवण्यात येतात. इतक्या मोठय़ा प्रमाणावर कैद्यांना वर्ग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे सर्व आरोपी खून, बलात्कार, दरोडा, बनावट नोटा प्रकरण, हाणामाऱ्या पाकीटमार, अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविणे आदी गुन्हय़ातील आहेत. कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात एकूण चार बराकी असून त्यात कोपरगाव, शिर्डी, राहाता व लोणी या एकूण चार पोलीस ठाण्यांचे न्यायालयीन चौकशीतील कैदी ठेवण्यात येतात.

16 कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सुमारे 91 पेक्षा जास्त कैदी होते. त्यांची सुरक्षा, औषधोपचारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्याच्या कमतरतेमुळेही तहसीलदार व निवासी नायब तहसीलदार यांनी पुढाकार घेत हे कैदी अन्यत्र पाठवण्याच्या प्रयत्नात होते. तहसीलदार विजय बोरुडे यांनी कारागृहाला भेट दिली होती . पोलीस अधीक्षक मनोज पाटील शिर्डी उपविभागाचे पोलीस अधिकारी संजय सातव यांनीही या प्रश्नावर तुरुंग प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला होता.

त्यावेळी 50 कैदी पाठवण्याची परवानगी कारागृह उपमहानिरीक्षक पश्‍चिम विभाग येरवडा येथील योगेश देसाई यांनी देत कैद्यांना वर्ग करताना पोलीस पथकास सुरक्षाविषयक सूचनांचे पालन करून कोरोना-19 ची तपासणी करून निगेटिव प्रमाणपत्रासह वर्ग करण्यात यावे अशा अटीवर देण्यात आली आहे. पन्नास कैद्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येऊन दोन मोठ्या पोलीस गाड्यांसह 25 शस्त्रधारी पोलीस, एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक व तीन उपनिरीक्षक आशा पोलीस बंदोबस्तात त्यांना नाशिक कारागृहात वर्ग करण्यात आले आहे.

राहाता तहसील कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून कैद्यांसाठी तुरुंग तयार आहे. मात्र तेथे सध्या रद्दी व भंगार साहित्य पडल्याचे माहिती मिळाली आहे. हे कारागृह का सुरू केले जात नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे कारागृह सुरू झाल्यावर पोलीस प्रशासनावरील ताण कमी होणार आहे.