
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन आणि आदाणी इलेक्ट्रीसिटी कंपनी व्यवस्थापनामध्ये कामगारांना 45 हजार रूपयांपासून 55 हजार 200 रुपये एवढा बोनस देण्याबाबत करार झाला आहे. तसेच कंत्राटी कामगारांना 8.33 टक्के आणि 27 दिवसांच्या भरपगारी रजेचे वेतन बोनस म्हणून देण्यात येणार आहे.
वीज कामगारांना दिवाळी पूर्वी बोनस द्यावा अशी मागणी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेबर रोजी केली होती. मात्र व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने मुंबई इलेक्ट्रिक संघर्ष समितीने कामगारांची सभा घेत 30 ऑक्टोबरपासून बेमुदत बंदचा इशारा दिला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या व्यवस्थापनाने युनयिन सोबत चर्चा करून बोनसबाबत करार केला. या करारावर कंपनीच्यावतीने उपाध्यक्ष अभय ताम्हाणे तर युनियनच्यावतीने सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी सह्या केल्या.
महावितरण, महापारेषण, महानिर्मितीच्या कामगारांना पंधरा हजार रुपये बोनस
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यांमधील कामगारांच्या बोनसबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बैठक झाली. त्यानुसार नियमित कामगारांना 15 हजार रूपये तर कंत्राटी कामगरांना 9 हजार रूपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला.


























































