पुलगाव दारूगोळा भांडारात भीषण स्फोट, 6 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वर्धा

देशातील सर्वात मोठा व आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा शस्त्रसाठा असलेल्या पुलगाव येथील लष्कराच्या केंद्रीय दारूगोळा भांडाराजवळ एका मैदानात मंगळवारी पहाटे 5.30च्या सुमारास स्फोटकांचा भीषण स्फोट झाला. यामध्ये सहा जण ठार, तर 11 जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका जवानाचाही समावेश आहे. ट्रकमधून स्फोटके खाली करताना एका कामगाराच्या हातातून बॉम्बची पेटी खाली कोसळली. यामुळे पहाटे पुलगावचा परिसर कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने प्रचंड हादरला. झोपेत असलेल्या पुलगावासह आजूबाजूच्या गावांमधील लोक घाबरून जागे झाले.

2016 मध्ये झालेल्या स्फोटकांमुळे हे भांडार हादरले होते. यामध्ये 16 जवान ठार झाले हेते. दोन वर्षांपूर्वीची ही घटना समोर असतानाच मंगलवारी पुन्हा या भांडाराजवळ स्फोट झाला आहे. पुलगाव सेंट्रल ऍम्युनिशन डेपोजवळचे खुले मैदान मध्य प्रदेशमधील खामरिया येथील लष्कराच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीस दारूगोळा कारखान्यास मुदतबाह्यस्फोटके नष्ट करण्यासाठी देण्यात आले होते. तेथेच ही घटना घडली.

मृतांत स्थानिक पाच कामगार
मृतांत पुलगावजवळच्या सोनेगाव येथील तिघांचा समावेश आहे. नारायण पचारे, विलास पचारे, प्रभाकर वानखेडे अशी त्यांची नावे आहेत. राजकुमार भोवते, प्रवीण मुंजेवार हे मृत केळापूर येथील राहणारे आहे. यामधील उदयवीर सिंह हे मृत मध्य प्रदेशातील जबलपूर येथील आहेत. जखमींमध्ये सोनेगाव येथील पाचजण, केळापूरमधील दोघे आणि जामणी येथील तिघांचा समावेश आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख
स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

कंत्राटदाराची निष्काळजी नडली
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील खमेरिया ऑर्डनन्स फॅक्टरीतील मुदतबाह्य स्फोटके येथे निकामी करण्यासाठी या भांडाराच्या जवळच असलेल्या सोनेगाव येथील मोकळ्या मैदानात आणण्यात आली होती. ही स्फोटके एका ट्रकमधून उतरवीत असताना एका कामगाराच्या हातामधील बॉम्बची पेटी खाली कोसळली. यामुळे चारजण जागीच ठार झाले.