
दहावीच्या मूल्यांकनाचे काम करणाऱया शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना लोकल प्रवासाची मुभा देण्यास राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली. मात्र त्यासाठीची कार्यवाही शिक्षण उपसंचालक कार्यालयातून अत्यंत संथगतीने सुरू असल्याने निकालांचे कामकाज होईपर्यंत लोकलने प्रवास करायला मिळणे शक्य होणार नसल्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.
मुंबई-ठाणे परिसरातील शाळांमध्ये दहावीच्या मूल्यांकन प्रक्रियेचे कामकाज करणाऱया शिक्षकांना आपल्या शाळांमध्ये पोहोचता यावे म्हणून शिक्षक संघटनानी मागणी लावून धरली होती. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रवासाला मान्यता दिल्यानंतर मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शिक्षकांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात असलेल्या 12 हजारांहून अधिक शाळांमध्ये 13 हजार 300 शिक्षकांना दहावीच्या मूल्यांकन आणि निकालाच्या कामकाजासाठी डय़ुटी लावण्यात आली आहे. मात्र त्यातील आज सायंकाळपर्यंत या शिक्षकांपैकी केवळ सहा हजार शिक्षकांची लोकल रेल्वेच्या प्रवासासाठी नोंदणी केली असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली.


























































