#Video अमेरिकेचा वर्णद्वेषी चेहरा पुन्हा उघड, 6 वर्षाच्या कृष्णवर्णीय मुलीला अटक

1116

अमेरिकेत वर्णद्वेषातून कृष्णवर्णीयांवर हल्ले झाल्याच्या घटना नव्या राहिलेल्या नाहीत. अमेरिकेतील पोलिसांचा वर्णद्वेषाचा काळा चेहरा एका व्हिडीओमुळे जगासमोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका 6 वर्षाच्या कृष्णवर्णीय मुलीला पोलिसांनी अटक केल्याचे दिसत आहे. ती मुलगी कृपया मला सोडा, मला पोलिसांकडे नाही जायचे अशी दयेची याचना करताना दिसत आहे. या मुलीचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो ऐकूनही पोलिसांना तिची दया येत नाही असं या व्हिडीओत दिसून आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले.

हा व्हिडीओ अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातल्या ओरलँडो येथील आहे. या शहरातील ओरलँडो चार्टर शाळेत ही कृष्णवर्णीय मुलगी शिकायला होती. 2019 साली सप्टेंबर महिन्यात या मुलीने शाळेतील एका कर्मचाऱ्याला मारले होते असा आरोप तिच्यावर झाला होता. त्यानंतर शाळेतील सुरक्षा अधिकारी डेनिस टर्नर याने पोलिसांत तिची तक्रार दिली होती. तक्रारीमुळे  पोलिसांनी तिला शाळेतच अटक केली. ती मुलगी दयेची भीक मागत असतानाही त्या पोलीस अधिकाऱ्याला तसेच टर्नरला तिची दया आली नाही. पोलीस अधिकाऱ्याने त्या मुलीच्या हातात बेड्या ठोकत तिला पोलिसांच्या गाडीतून पोलीस ठाण्यात नेले. याबाबत तिच्या पालकांना समजल्यानंतर तिच्या पालकांनी तिची सुटका केली. या मुलीच्या वकिलाच्या हाती शाळेतून तिला अटक झाल्याचा व्हिडीओ हाती लागला होता. सध्या शाळा व मुलीच्या पालकांमध्ये न्यायालयीन संघर्ष सुरू आहे. या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात मुलीला अटक केल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी शाळेवर व शाळेचा सुरक्षा अधिकारी डेनिस टर्नर आणि पोलिसांवर जोरदार टीका केली आहे. मुलीसोबत झालेली वर्तणूक अत्यंत चुकीची असून शाळेकडून तिला आयुष्यभर लक्षात राहिल अशी कटू आठवण देण्यात आली आहे असं अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलं ाहे.

आपली प्रतिक्रिया द्या