
ज्या शोधासाठी मोठमोठे भूगर्भ शास्त्रज्ञ आणि पुराणवस्तू संशोधक आपलं आयुष्य वेचतात, अशी एक दुर्मीळ वस्तू एका सहा वर्षांच्या मुलाला सापडली आहे.
अमेरिकेच्या मिशिगनमध्ये राहणाऱ्या या मुलाचं नाव ज्यूलियन गगनॉन असं आहे. ज्यूलियन त्याच्या कुटुंबासह तेथील डायनासोर हिल नेचर प्रिझर्व्हमध्ये फिरत होता.
तो फिरत असताना त्याच्या पायाला एका वस्तूचा अडथळा झाल्याने तो अडखळला. त्याने ती वस्तू उचलून पाहिली तर ती एखाद्या दगडाप्रमाणे दिसत होती.
त्याच्या वडिलांनी तो दगड नेऊन प्रयोगशाळेत जमा केला. तो दगड काय असावा, हे शोधताना त्यांना कळलं की तो 12 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या एका महाकाय प्राण्याचा दात आहे. ज्यूलियनला तो ड्रॅगनचा दात असावा, असं वाटत होतं. पण, हा प्राणी वेगळा आहे.
या प्राण्याचं नाव मस्टोडंस असं आहे. 12 हजार वर्षांपूर्वी मस्टोडंस उत्तर आणि मध्य अमेरिकेत सापडत होते. या प्राण्यांची उंची 2.9 मीटर इतकी होती तर वजन 11 टन इतकं होतं. काळाच्या ओघात ते प्राणी नष्ट झाले.





























































