लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात अंदाजे 61.30 टक्के मतदान

11

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 14 मतदार संघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 61.30 टक्के मतदान झाले असून काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतरही मतदारांच्या रांगा असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरु होते. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना झाली नसून मतदान शांततेत पार पडले. राज्यात आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 63.04 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.

दरम्यान, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिन आणि व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते तत्काळ बदलून देण्यात आले. आज झालेल्या 14 मतदार संघात एकूण 249 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तर 28 हजार 691 मतदान केंद्रांपैकी 3 हजार 825 मतदान केंद्रांचे लाईव्ह वेबकास्टींग करण्यात आले. 1 लाख 54 हजार कर्मचारी या मतदान केंद्रांवर कार्यरत होते. 90 मतदान केंद्रांवर संपूर्ण महिला कर्मचारी होत्या तर चार मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे कार्यरत होती.

तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजित मतदान अशाप्रकारे 

जळगाव 58.00 टक्के, रावेर 58.00 टक्के, जालना 63.00 टक्के, औरंगाबाद 61.87 टक्के, रायगड 58.06 टक्के, पुणे 53.00 टक्के, बारामती 59.50 टक्के, नगर 63.00 टक्के, माढा 63.00 टक्के, सांगली 64.00 टक्के, सातारा 57.06 टक्के, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 62.26 टक्के, कोल्हापूर 69.00 टक्के, हातकणंगले 68.50 टक्के. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या 14 मतदार संघात 62.88 टक्के मतदान झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या